वाहनाची झाडाला धडक; एक ठार
By admin | Published: June 3, 2016 01:14 AM2016-06-03T01:14:14+5:302016-06-03T01:14:14+5:30
कुरखेडावरून गडचिरोलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दुसरा गंभीर
वैरागडनजीकची घटना : एक गंभीर जखमी
वैरागड : कुरखेडावरून गडचिरोलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना कढोली-वैरागड मार्गावर वैरागडपासून दोन किमी अंतरावर बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. रोशन रामटेके (३४) रा. गांधीनगर कुरखेडा असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तर जाकीर शेख (२२) रा. पवनी जि. भंडारा हा गंभीर जखमी झाला आहे.
एम एच-४०-केआर-२३९३ क्रमांकाचे चारचाकी वाहन कुरखेडावरून गडचिरोलीकडे जात होते. दरम्यान पाटणवाडानजीकच्या वळणावर या वाहनाने झाडाला जबर धडक दिली. यात रोशन रामटेके व जाकीर शेख गंभीर जखमी झाले. आवाजामुळे पाटणवाडातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. या चारचाकी वाहनाचा समोरील भाग पूर्णत: क्षतीग्रस्त झाला. चालकाचे पाय दरवाजात अडकले होते. जमलेल्या लोकांनी आरीने वाहनाचा दरवाजा कापून वाहनचालक जाकीर शेख याला वाहनातून बाहेर काढले. रोशन रामटेके हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. याच वाहनातील तिसरा व्यक्ती कढोली मार्गाने पळून जात असताना लोकांनी त्याला पकडले. त्यानंतर पोलीस पाटील परशुराम कुमरे यांनी फोन करून घटनास्थळावर रुग्णवाहिका बोलाविली. दोन्ही जखमींना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रोशन रामटेके याचा मृत्यू झाला. या घटनेतील अपघातग्रस्त वाहन समोरून पूर्णत: क्षतीग्रस्त झाले. या घटनेसंदर्भात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बिट जमादार देवराव सहारे करीत आहेत. (वार्ताहर)