दारु तस्करी करणाऱ्या वाहनाची सायकलस्वारास धडक
By Admin | Published: November 7, 2016 01:40 AM2016-11-07T01:40:14+5:302016-11-07T01:40:14+5:30
दारु तस्करी करणाऱ्या वाहनाने सायकलस्वारास दिलेल्या धडकेत पती - पत्नी जखमी झाले. सदर अपघात ६ नोव्हेंबर रोजी
आंबेशिवणीनजीकची घटना : पती - पत्नी जखमी
गडचिरोली : दारु तस्करी करणाऱ्या वाहनाने सायकलस्वारास दिलेल्या धडकेत पती - पत्नी जखमी झाले. सदर अपघात ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास आंबेशिवणी-गिलगाव मार्गावर आंबेशिवणीपासून एक किमी अंतरावर घडली.
टिकाराम तुकाराम धुर्वे (५०) व सुंदराबाई टिकाराम धुर्वे (४५) रा. आंबेशिवणी असे जखमी पती-पत्नीचे नाव आहे. एमएच ३३ ए ३९५० क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने दारूची तस्करी केली जात होती. सदर वाहन भरधाव वेगाने गिलगाववरून गडचिरोलीकडे येत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने सायकलस्वारास वाहनाने धडक दिली. यामध्ये सायकलवरील पती - पत्नी जखमी झाले. अपघात घडताच वाहनचालक घटनास्थळावरुन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तसेच रुग्णवाहिकेस पाचारण करुन जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
सदर वाहनात १ लाख २० हजार रूपये किमतीच्या विदेशी दारूच्या ६०० निपा होत्या. पोलिसांनी पाच लाखाचे वाहन व दारू मिळून एकूण ६ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाहन मालक प्रशांत येडावार व वाहन चालकावर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (नगर प्रतिनिधी)