गडचिरोलीत दोन ठिकाणी नक्षल्यांनी केली जाळपोळ; ट्रॅक्टर्स जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 10:52 AM2020-04-08T10:52:46+5:302020-04-08T12:04:16+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, काहीकंत्राटदारांनी अतिदुर्गम भागात काम सुरूच ठेवले. याचाच गैरफायदा घेत नक्षल्यांनी रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: कमलापूर-लिंगमपल्ली व किष्टापूर या दोन ठिकाणी सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाकरिता असलेले ट्रॅक्टर्स नक्षल्यांनी मंगळवारी रात्री जाळून टाकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आले. प्रशासनाकडून कंत्राटदारांना काम बंद ठेवण्याचे सांगण्यात आले. मात्र, काहीकंत्राटदारांनी अतिदुर्गम भागात काम सुरूच ठेवले. याचाच गैरफायदा घेत नक्षल्यांनी रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.
कमलापूर-लिंगमपल्ली रस्त्यावरील पुलाच्या कामावर असलेले २ ट्रॅक्टर आणि २ मिक्सर मशीन नक्षल्यांनी जाळपोळ केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. काल मध्यरात्री सदर घटना घडली असून यामध्ये संबंधित ठेकेदाराने नुकसान झाले आहे.
सध्या लॉकडाऊन असल्याने संपूर्ण रहदारी बंद करण्यात आली आहे. देशावर नव्हे तर संपूर्ण जगावरच कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. संपूर्ण प्रशासन लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र जठत असून दिवस-रात्र पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. अश्या परिस्थितीत दुर्गम आणि अतिदुर्गम भागात कंत्राटदारांना काम बंद करण्याचे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आली होती. मात्र अशाही परिस्थितीत दुर्गम भागात काम सुरू ठेवल्याने नक्षल्यांना एक प्रकारचा संधी मिळाला आहे आणि याच संधीचा फायदा घेत काल मध्यरात्री कमलापूर ते लींगमपल्ली रस्त्यावरील पुलाचा कामावरील २ ट्रॅक्टर आणि २ मिक्सर मशीन जाळपोळ केली. या घटनेने या परिसरात पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे.