पडताळणी उपायुक्तांनी कार्यालयातच बनवले बेडरूम
By दिगांबर जवादे | Published: September 4, 2023 08:45 PM2023-09-04T20:45:29+5:302023-09-04T20:45:42+5:30
कारवाई करण्याची मागणी, येथेच राहतात मुक्कामी
गडचिराेली : येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुधन धारगावे यांनी कार्यालयाच्या भांडार कक्षालाच बेडरूम बनविले आहे. या ठिकाणी आलिशान बेड ठेवले आहेत. रात्रभर त्यांचा याच ठिकाणी मुक्काम असते. कार्यालयाचा वापर ते स्वत:च्या घराप्रमाणे करत आहेत. हा अतिशय गंभीर प्रकार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक रमेश चाैधरी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
धारगावे यांच्याकडे चंद्रपूर येथील प्रभार देण्यात आला आहे. त्यांना आठवड्यातून काही ठराविक दिवस गडचिराेली येथे असणे आवश्यक आहे. मात्र ते गडचिराेली येथे नेमके काेणत्या दिवशी राहतात याचा काहीच पत्ता नाही. परिणामी प्रलंबित फाईलींची संख्या वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना परत जावे लागत आहे. मुख्यालय साेडताना त्याची माहिती वरीष्ठांना देणे आवश्यक आहे. मात्र धारगावे नेमके कुठे राहतात याचा काहीच पत्ता नाही.
प्रत्येक अधिकाऱ्याला शासनाकडून घरभाडे भत्ता दिला जाते. त्यापासून धारगावेसुद्धा अपवाद नाहीत. मात्र घरभाडे वाचविण्यासाठी धारगावे यांनी कार्यालयालाच घर बनविले आहे. कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील भांडार कक्षात त्यांनी बेड आणून ठेवला आहे. रात्री याच ठिकाणी त्यांचा मुक्काम असते. याच ठिकाणी ते आंघाेळही करीत असावेत. दिवसभर अंतरवस्त्र, टाॅवेल वाळत राहते. अधिकाऱ्याने कार्यालयातच बस्थान मांडणे हा अतिशय गंभीर प्रकार आहे.
त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रमेश चाैधरी यांनी केली आहे. याबाबत चाैधरी यांनी विराेधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिले असून स्थानिक पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. धारगावे यांच्यावर कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी देवसुधन धारगावे यांच्याशी संपर्क साधला संपर्क हाेऊ शकला नाही.