वरखडे सुपारी कट प्रकरणात आणखी दोन आरोपींवर गुन्हा दाखल
By admin | Published: October 14, 2015 01:53 AM2015-10-14T01:53:12+5:302015-10-14T01:53:12+5:30
महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरीराम वरखडे यांची हत्या करण्यासाठी रचण्यात आलेल्या कटात आणखी दोन आरोपींची भर पडली आहे.
आरोपींची संख्या सात : आजी आणि माजी सचिव गुन्ह्यात सहभागी
आरमोरी : महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरीराम वरखडे यांची हत्या करण्यासाठी रचण्यात आलेल्या कटात आणखी दोन आरोपींची भर पडली आहे. राणी दुर्गावती आदिवासी विकास संस्थेचे सचिव नारायण धकाते व उमेश गजपुरे यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे पोलीस तपासात आढळून आल्यानंतर या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
या प्रकरणात यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता आरोपींची संख्या सात झाली आहे. राणी दुर्गावती आदिवासी विकास संस्था जोगीसाखरा या संस्थेच्या वादातून माजी आमदार हरिराम वरखडे यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्याचा कट चंद्रपूर पोलिसांनी नांदा फाटा येथील हत्याकांडाचा तपास करताना उघडकीस आणला होता. त्यानंतर हे प्रकरण आरमोरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी मयूर गणेश मल्लेलवार, पिंटू नारायण गायधने, दिलीप राजीराम पारधी, प्रभाकर सपाटे, संतोष गोंधोळे या पाच आरोपींना अटक केली होती. त्यांची आता न्यायालयीन कोठडीत चंद्रपूर कारागृहात आहेत. याप्रकरणाचा तपास करीत असताना आरमोरीचे ठाणेदार सुभाष ढवळे यांना या प्रकरणात माजी आमदार हरिराम वरखडे यांचे निकटवर्तीय नारायण धकाते व उमेश गजपुरे यांचा सहभाग असल्याचे आढळून आले. त्यानंतर या दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. वरखडे सुपारी कटात संस्थेचे आजी व माजी दोन्ही सचिव अडकले असल्याने आरमोरीत या प्रकरणाची सध्या चर्चा रंगत आहे.
वरखडे यांची हत्या करून त्यांच्या सर्व संस्था आपल्या ताब्यात घेण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आला होता.