पुढले एकदोन आठवडे अत्याधिक महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 03:28 PM2020-03-21T15:28:03+5:302020-03-21T15:28:32+5:30
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाने उचलेली पावले अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी त्याला १०० टक्के साथ द्यावी असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाने उचलेली पावले अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी त्याला १०० टक्के साथ द्यावी असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले आहे.
ते पुढे म्हणतात, आत्ताची लढाई ही जगण्यामरण्याचीच आहे. अद्याप ग्रामीण भागात ही साथ पोहचलेली नाही. केवळ त्याविषयीची थोडीफार माहिती व भीती पोहचली आहे. जर ग्रामीण भागात ही साथ आली तर भयंकर स्थिती निर्माण होईल. आपल्याला ते घडण्यापासून रोखायचे आहे.
आतापर्यंत राज्यात याच्या १५० केसेस झाल्या आहेत. म्हणजे दर आठवड्याला हा आकडा दुप्पट होतो आहे. यासंदर्भात मिडिया व सोशल मिडियावरून माहिती देणे सुरू आहे. शासनही आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करीत आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. नागरिकांनी त्यांना दिलेल्या सूचना तंतोतंत पाळाव्यात व जी काळजी घ्यावयास सांगितली जाते आहे ती घ्यावी.
१९१७ साली स्पॅनिश फ्लूची साथ पसरली होती. तीत किमान ५ कोटी लोक बळी पडले होते. त्या तुलनेत कोरोनाचा प्रसार सध्यातरी भारतात कमी आहे. मात्र तो केव्हाही वाढून आटोक्याबाहेर जाऊ शकतो. माझे सर्वांना आवाहन आहे की, कोरोनाला पसरण्यापासून रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत.