पशुवैद्यकीय सेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 12:48 AM2019-10-26T00:48:13+5:302019-10-26T00:49:39+5:30
धानोरा हा आदिवासीबहुल तालुका असून या तालुक्यातील लोकांचा उदरनिर्वाह शेती व पशुपालन व्यवसायावर चालतो. धानोरा तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. धानोरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत लगतची पाच ते सहा गावे येतात. या दवाखान्यात केवळ एकच पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), वरिष्ठ लिपीक, ड्रेसर व परिचर अशी चार पदे रिक्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत धानोरा येथे श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र या दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची चार पदे रिक्त असून इमारत पूर्णत: मोडकळीस आली आहे. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे या पशुवैद्यकीय दवाखान्याची सेवा कोलमडली असून हा दवाखाना विविध समस्यांच्या गर्तेत सापडला आहे.
धानोरा हा आदिवासीबहुल तालुका असून या तालुक्यातील लोकांचा उदरनिर्वाह शेती व पशुपालन व्यवसायावर चालतो. धानोरा तालुक्यात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. धानोरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत लगतची पाच ते सहा गावे येतात. या दवाखान्यात केवळ एकच पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), वरिष्ठ लिपीक, ड्रेसर व परिचर अशी चार पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील डॉक्टरांना सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासकीय बैठका, दौरे तसेच धानोराबाहेरील खेडेगावांमध्ये आजारी पशुंच्या उपचारासाठी जावे लागते. अशावेळी सदर दवाखाना बंद ठेवावा लागतो. दुसरा उपाय डॉक्टरांजवळ नसतो. सदर दवाखाना परिसरातील अनेक पशुपालक आपल्या आजारी पशुंना औषधोपचारासाठी घेऊन येतात. मात्र महत्त्वाच्या कामानिमित्त येथील एकमेव डॉक्टर दवाखान्या बाहेर राहत असल्याने पशुपालकांना परत जावे लागते.
सदर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची इमारत खूप जुनी असून कौलारू छताची आहे. पावसाळ्यात या इमारतीला पाणी गळती लागली होती. गळतीमुळे येथील लाकूडफाटाही कुजलेल्या स्थितीत आहे. जोरदार पाऊस झाल्यास येथील छत के व्हा कोसळेल, याचा नेम नाही. येथील खिडक्यांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अनेकदा साप, विंचू आदींसह विविध सरपटणारे प्राणी येथे आढळून येतात. परिचर सुद्धा नसल्याने सदर दवाखान्याची स्वच्छता येथील डॉक्टरांनाच करावी लागते. पशुपालक आपली जनावरे नेल्यावर सोबत दोन लोकांना न्यावे लागते. कारण येथे एकच डॉक्टर असल्याने पशुवर उपचार करताना अडचण येते. पशुवर उपचार करताना पशुंना बांधून ठेवावे लागते. मात्र त्यासाठी येथे दुसरा कर्मचारी नाही. त्यामुळे पशुपालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. सदर दवाखान्यातील रिक्तपदे भरण्याची गरज असल्याबाबतचा पत्रव्यवहार वरिष्ठांना करण्यात आल्याचे माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ उसेंडी यांनी लोकमतशी बोलताना दिली. एकूणच धानोराच्या पशुवैद्यकीय सेवेकडे प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
इतर पशुवैद्यकीय दवाखान्यात रिक्त पदांचा डोंगर
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक तालुकास्तरावर श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना चालविला जातो. याशिवाय आष्टी, घोट, वैरागड व इतर मोठ्या गावांमध्ये पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र या दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, पशुपट्टीबंधक, परिचर, सहायक अशी विविध पदे रिक्त आहेत. सदर रिक्तपदे भरण्याबाबतची मागणी शेतकºयांसह पशुपालकांनी अनेकदा प्रशासन व शासनाकडे केली होती. यासंदर्भात जिल्हास्तरावर निवेदन देण्यात आले. मात्र दखल घेण्यात आली नाही.
पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुंच्या सेवा व पशुपालकांच्या फायद्यांसाठी काही योजना अंमलात आणल्या जातात. मात्र अधिकारी व कर्मचाºयांची पदे रिक्त असल्याने शासनाच्या योजना शेवटच्या पशुपालकांपर्यंत पोहोचत नाही.