रिक्त पदांमुळे पशुवैद्यकीय सेवा अस्थिपंजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 05:00 AM2020-09-22T05:00:00+5:302020-09-22T05:00:20+5:30
चामोर्शी तालुक्याच्या पशुवैद्यकीय विभागात अनेक पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय दवाखाने थातुरमारतूर सुरू आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. मागील महिन्यात या आजाराने थैमान घातले होते. पशुसंवर्धन विभागामार्फत पाळीव जनावरांना रोगप्रतिबंधक लस, तपासणी व खच्चीकरण, गर्भधारणा तपासणी, वंधत्व तपासणी करण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील जनावरांच्या आरोग्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती करण्यात आली. मात्र तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे १६ पदे मंजूर आहेत. यापैैकी एकच पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. तब्बल १५ पदे रिक्त असल्याने तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा पूर्णत: ढासळली आहे. तसेच जनावरांचे आरोग्य धोेक्यात आले आहे.
चामोर्शी तालुक्यात पशुवैद्यकीय पर्यवेक्षकांची एकूण ११ पदे मंजूर आहेत. दोन पर्यवेक्षकांची बदली झाल्याने चार पदे रिक्त आहेत. पशुपट्टीबंधकाची एकूण सहा पदे मंजूर आहेत. यापैकी चार पदे भरण्यात आली असून दोन पदे रिक्त आहेत. परिचराच्या २४ पदे मंजूर आहेत. यापैकी २१ पदे भरण्यात आली असून तीन पदे रिक्त आहेत.
तालुक्यातील तुंबडी, जामगिरी, वायगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचर नसल्याने पशुवैद्यकीय दवाखाने उघडतच नाही. फिरत्या पथकाला वाहन नसल्याने त्यांची सेवा थंडबस्त्यात असून हे फिरते पथक कागदावर दिसून येते.
चामोर्शी तालुक्याच्या पशुवैद्यकीय विभागात अनेक पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय दवाखाने थातुरमारतूर सुरू आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. मागील महिन्यात या आजाराने थैमान घातले होते. पशुसंवर्धन विभागामार्फत पाळीव जनावरांना रोगप्रतिबंधक लस, तपासणी व खच्चीकरण, गर्भधारणा तपासणी, वंधत्व तपासणी करण्यात येते. पशुपालकांना दुधाळू जनावरांचे वाटप, शेळी वाटप, कुकुटपक्षी वाटप आदी योजना राबविण्याची जबाबदारी या विभागावर आहे. मात्र सदर योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा रिक्तपदाने खिळखिळी झाली असल्याने पशुपालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासन व प्रशासनाने गतीने कार्यवाही करून चामोर्शी तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा बळकट करण्यासाठी रिक्तपदे भरावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
तालुक्यात २३ हजार पेक्षा अधिक पशुधन
गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी हा भौगोलिक क्षेत्रफळाने व लोकसंख्येने सर्वात मोठा तालुका आहे. १९ व्या पशुगणनेनुसार गायवर्ग ६७ हजार ७५१, म्हैसवर्ग ७ हजार ६९५ , मेंढ्या ३ हजार ५३५, शेळ्या २३ हजार ३२३, कुकुटपक्षी ९४ हजार ८२३, इतर २ हजार २५७, एकूण १ लाख ९९ हजार ३८४ इतकी आहे. तसेच जि. प. स्तर अंतर्गत पैदास सक्षम संकरित ५८५ देशी, गावठी गायी १८ हजार ५९३, म्हैस ४ हजार ४२३, एकूण २३ हजार ६०४ आहे. जि.प.अंतर्गत श्रेणी १ चे १४ व श्रेणी २ चे ५ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. आष्टी येथे फिरते चिकित्सालय व चामोर्शी येथे राज्य शासनाचे लघु पशुचिकित्सालय आहेत. तालुक्यात एकूण २१ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.
जनावरांवरील लम्पी त्वचेचा आजार आटोक्यात आणण्यासाठी महिनाभरापूर्वी नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यात लम्पी आजार बºयापैकी नियंत्रणात आहे. रिक्तपदांबाबत आपण शासनाला अनेकवेळा पत्र व्यवहार करून पदे भरण्याची मागणी केली आहे. तसा ठरावही जिल्हा परिषदेच्या सभेत पारित करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधींचा पुरवठा करण्यात येईल.
- प्रा.रमेश बारसागडे,
कृषी व पशुसंवर्धन सभापती, जि.प.गडचिरोली