कुलगुरू पालिकेचे स्वच्छतादूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:58 PM2017-12-22T23:58:04+5:302017-12-23T00:00:49+5:30
गडचिरोली शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता नगर परिषदेमार्फत विविध उपक्रम व उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात आणखी भर म्हणून नगर परिषदेने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांची स्वच्छता सर्वेक्षण २०१८ करिता ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता नगर परिषदेमार्फत विविध उपक्रम व उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात आणखी भर म्हणून नगर परिषदेने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांची स्वच्छता सर्वेक्षण २०१८ करिता ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. २२ डिसेंबरला नगर पालिकेत पार पडलेल्या कार्यक्रमात कुलगुरू कल्याणकर यांचा नगराध्यक्ष योगिता पिपरे व मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, पाणीपुरवठा सभापती केशव निंबोड, शिक्षण सभापती नितीन उंदीरवाडे, महिला व बालकल्याण सभापती अल्का पोहणकर, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, सतीश विधाते, नीता उंदीरवाडे, अनिता विश्रोजवार, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे उपस्थित होते.
नगर पालिकेच्या वतीने शहरातील अडीच हजार नागरिकांना शौचालय बांधण्याकरिता अनुदान देऊन शहर हागणदारीमुक्त करण्यात आले. तसेच शहर स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याकरिता प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी प्रास्ताविकेतून दिली.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर म्हणाले, शहर स्वच्छ आणि सुंदर होण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, शहराला स्वच्छ करण्याकरिता शहरातील नागरिकांनीही एकत्र येऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वत:च्या घरापासून स्वच्छतेची सुरूवात करावी व स्वच्छतेची गुणवत्ता टिकवावी, असे आवाहन केले. याप्रसंगी नगराध्यक्षांनीही विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार गणेश ठाकरे यांनी मानले.
स्वच्छता पाळणाºयांचा सत्कार
गडचिरोली शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध विभाग कार्य करीत आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालय व परिसरात स्वच्छता पाळल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते तसेच शाळा व परिसरात स्वच्छता पाळल्याबद्दल जवाहरलाल नेहरू नगर परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांना कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.