विदर्भवाद्यांनी केली वीज बिलाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:01:14+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने येथील वीज वितरण कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाची होळी केली. यावेळी समितीचे जिल्हा संयोजिक अरूण मुनघाटे, रमेश उप्पलवार, एजाज शेख आदीसह विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/कुरखेडा/घोट : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ९ ऑगस्ट रोजी रविवारला जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाची होळी करून महावितरणच्या धोरणाविरोधात नारेबाजी करण्यात आली. दरम्यान विदर्भवाद्यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळातील सर्वांचे वीज बिल निम्मे करा, अशी मागणी केली.
विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने येथील वीज वितरण कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाची होळी केली. यावेळी समितीचे जिल्हा संयोजिक अरूण मुनघाटे, रमेश उप्पलवार, एजाज शेख आदीसह विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन पाठविण्यात आले.
कुरखेडा - विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा कुरखेडाच्या वतीने महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाची होळी करण्यात आली. त्यानंतर महावितरणच्या उपअभियंत्यांमार्फत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, उपाध्यक्ष घिसू खुणे, मुक्ता दुर्गे, रामचंद्र रोकडे, ज्ञानदेव चहारे, हेमलता भैसारे, प्रजीत लाडे, ठाकूरराम कोसरे आदी उपस्थित होते.
घोट - विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा घोटच्या वतीने येथील वीज वितरण कंपनीच्या ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाविरोधात नारेबाजी करण्यात आली. वीज बिल माफ होईपर्यंत गाव तिथे वीज बिलाची होळी करण्याचा ठराव ग्रामसभेत पारित करणार, असा इशारा निवेदनातून सरकारला देण्यात आला. याप्रसंगी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, परशुराम दुधबावरे, बाबुराव भोवरे, गिरीश उपाध्ये, करण गण्यारपवार, हेमंत उपाध्ये यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनातील मागण्या
कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल सरकारने स्वत: भरून जनतेला वीज बिलातून मुक्त करावे, कोरोना लॉकडाऊननंतर २० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे तसेच त्यानंतरचे वीज दर निम्मे करावे. विदर्भाला वीज प्रकल्पाच्या प्रदूषणातून मुक्त करावे, कृषीपंपाचे १२ ते १६ तासाचे भारनियमन बंद करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.