नागपूर विधान भवनावर फडकवणार विदर्भाचा झेंडा, विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्धार !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 06:00 PM2018-02-05T18:00:45+5:302018-02-05T18:00:57+5:30
विदर्भातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न संपविण्यासाठी आणि विदर्भाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव पर्याय आहे. असे असताना सरकार या मुद्यावर चाल ढकलपणा करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या १ मे महाराष्ट्र दिनी विदर्भातून हजारो शेतकरी, बेरोजगार, महिलांना घेऊन नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा फडकविला जाईल, असा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी येथे व्यक्त केला.
गडचिरोली : विदर्भातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न संपविण्यासाठी आणि विदर्भाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव पर्याय आहे. असे असताना सरकार या मुद्यावर चाल ढकलपणा करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या १ मे महाराष्ट्र दिनी विदर्भातून हजारो शेतकरी, बेरोजगार, महिलांना घेऊन नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा फडकविला जाईल, असा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी येथे व्यक्त केला.
समितीच्या वतीने येत्या मार्च, एप्रिल व मे महिन्यात केल्या जाणा-या विविध आंदोलनांची माहिती सोमवारी येथे नेवले व इतर पदाधिका-यांनी दिली. त्यात १ मार्चला शासनाच्या निषेधार्थ बेरोजगारांचे डिग्री जलाओ आंदोलन, तर १६ व १७ एप्रिलला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यात विदर्भ आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम राज्य राहीले हे पटवून दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
वर्षाला २ कोटी लोकांना रोजगार देऊ असे सांगणा-या सरकारमुळे नोटबंदीनंतर अनेक उद्योग बंद पडून लाखो युवक बेरोजगार झाले. आता आणखी ३० टक्के नोकरकपात करण्याचा सरकारचा मानस आहे. नोक-या कमी करणारे सरकार नवीन नोक-या काय देणार? दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढतच आहे. म्हणून विदर्भ राज्य वेगळे करून विदर्भवासियांच्या विकासाचा मार्ग मोकळा करा, अशी मागणी समितीच्या पदाधिका-यांनी सरकारला उद्देशून केली.
या पत्रपरिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे गडचिरोली जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, पश्चिम विदर्भाच्या महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, सुधाकर नाईक, जगदीश बद्रे, जिल्हा सचिव डॉ.देवीदास मडावी, घिसू पाटील खुणे, सुधाकर डोईजड, प्रतिभा चौधरी, अनिता मडावी, रमेश भुरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शब्द पाळला नाही तर सत्ता जाईल
भाजपने निवडणूक काळात दिलेले विदर्भ राज्याचे आश्वासन पाळण्याची ही वेळ आहे. आज विदर्भातील आमदारसंख्येच्या बळावर राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे राजकीय अडचणीतून भाजप सरकार विदर्भ राज्याचा मुद्दा टोलवत आहे. लगतच्या तेलंगणाच्या निर्मितीसाठीही आंध्रातील काँगे्रस सरकारने विलंब केला आणि दोन्ही राज्यात काँग्रेसला हार पत्करावी लागली. भाजपने शब्द पाळण्यास विलंब लावल्यास भाजपाचीही तीच गत होईल, असा इशारा राम नेवले यांनी दिला.