विदर्भाच्या मुद्यावर पालिकेच्या निवडणुका लढविणार

By admin | Published: February 14, 2016 01:21 AM2016-02-14T01:21:52+5:302016-02-14T01:21:52+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आजवर विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने आंदोलने करण्यात आली. मात्र विदर्भ राज्याची निर्मिती झाली नाही.

Vidarbha will fight the elections in the municipal elections | विदर्भाच्या मुद्यावर पालिकेच्या निवडणुका लढविणार

विदर्भाच्या मुद्यावर पालिकेच्या निवडणुका लढविणार

Next

बॅलेटच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भ राज्याची लढाई : राजकुमार तिरपुडे यांची पत्रपरिषदेत माहिती
गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आजवर विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने आंदोलने करण्यात आली. मात्र विदर्भ राज्याची निर्मिती झाली नाही. आम्हीही स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी अनेक प्रयत्न केले. मात्र यात यश आले नाही. त्यामुळे आता विदर्भ राज्याची मागणी बळकट करून विदर्भाची ताकद दाखविण्यासाठी विदर्भ माझा पार्टीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज नगर पालिकांसह महाराष्ट्रातील ६० नगर परिषदेच्या निवडणुका लढविणार आहोत, अशी माहिती विदर्भ माझा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी शनिवारी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विदर्भ माझा पार्टीचे सरचिटणीस मंगेश तेलंग, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रवक्ते मधुकर उईके उपस्थित होते. यावेळी राजकुमार तिरपुडे म्हणाले, काँग्रेस पक्षाने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्याकडे दुर्लक्ष केले. शिवसेना व मनसेचा स्वतंत्र विदर्भ राज्याला विरोध आहे. भाजपनेही आपला शब्द फिरविला असून त्यांनीही विदर्भ राज्याच्या निर्मितीकडे पाठ फिरविली आहे. यामुळे विदर्भातील जनतेची घोर फसवणूक झाली. विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य होणे काळाची गरज आहे. त्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा पालिका निवडणुकीच्या माध्यमातून बळकट करणार आहोत, असेही तिरपुडे यावेळी म्हणाले.
१६ जानेवारी २०१६ रोजी आपण विदर्भ माझा या पक्षाची घोषणा केली व आता संपूर्ण विदर्भाचा दौरा आपण करीत आहोत. सत्ता मिळविणे हा आमच्या पक्षाचा उद्देश नाही. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे हा उद्देश आहे. आजवर विदर्भ राज्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन, मोर्चे, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ बंद आदीसह विविध प्रकारे आंदोलने झाली. मात्र याची दखल तत्कालीन व विद्यमान सरकारने घेतली नाही. गेल्या वर्षभरापासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत जनमानस सकारात्मक तयार झाला आहे. प्रत्येक विदर्भवादी नागरिक स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवर ठाम आहे. अनेक राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पाठींबा आहे. मात्र राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी सकारात्मक नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होऊ शकले नाही, असेही तिरपुडे यावेळी म्हणाले.
विदर्भ माझा पक्षाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात विदर्भ राज्य निर्मितीचे वातावरण निर्माण करणार असेही ते यावेळी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Vidarbha will fight the elections in the municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.