विदर्भवाद्यांनी रणशिंग फुंकून केली जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2016 02:30 AM2016-11-10T02:30:22+5:302016-11-10T02:30:22+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी वेळोवळी आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या अहेरी राजनगरीत कैै. राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात
अहेरीत बैठक : ५ डिसेंबरला विधिमंडळ अधिवेशनात करणार ठिय्या आंदोलन
अहेरी : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी वेळोवळी आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या अहेरी राजनगरीत कैै. राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात मंगळवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भवाद्यांची बैठक आयोजित करून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे रणशिंग फुंकले. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांमध्ये विदर्भ राज्याच्या मागणीची जनजागृती करून विधीमंडळ अधिवेशन काळात ५ डिसेंबरला होणाऱ्या ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, महिला आघाडीच्या अध्यक्ष रंजना मामर्डे, जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे, भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे, परशुराम सातार, रघुनाथ तलांडी, रमेश उप्पलवार, मनमोहन बंडावार, यशोदा गुरूनुले, प्रा. नागसेन मेश्राम, अर्चना निष्ठुरवार, लक्ष्मी दंडिकेवार उपस्थित होते.
स्वतंत्र विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक कैै. राजे विश्वेश्वरराव महाराज यांचे पूत्र कैै. राजे सत्यवानराव महाराज यांच्यासोबत अनेक विदर्भवाद्यांनी अहेरीतूनच अहेरी ते नागपूर ही पदयात्रा सुरू करून इतिहास घडविला होता. याची जाणीवही यावेळी करून देण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलन सुरू आहे. विदर्भ राज्याअभावी येथील युवक बेरोजगार होत आहेत. येथील सिंचन प्रकल्पही रखडले आहेत. मोठे उद्योगही होत नसल्याने येथे बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास अनेक सुशिक्षितांना रोजगार उपलब्ध होईल, असे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले. ‘विदर्भ देता की जाता’ अशा घोषणा कार्यक्रमात वारंवार झाल्याने परिसर निनादला. (तालुका प्रतिनिधी)