विदर्भवाद्यांची नागपुरात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:33 AM2018-06-20T01:33:30+5:302018-06-20T01:33:30+5:30
वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ४ जुलै रोजी नागपूर बंद पाळला जाणार आहे. ४ जुलैपासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. विदर्भ राज्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे,...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ४ जुलै रोजी नागपूर बंद पाळला जाणार आहे. ४ जुलैपासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. विदर्भ राज्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे यांनी दिली.
भाजप सरकारने सत्ते येण्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारला आश्वासनाचा विसर पडला आहे. महाराष्टÑात राहून विदर्भाचा विकास होणे शक्य नाही. विदर्भाचा विकास करायचा असेल तर स्वतंत्र राज्य होणे आवश्यक आहे. स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भातील जनतेने आजपर्यंत अनेकवेळा शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे. विदर्भाची मागणी आता निर्णायक स्थितीत पोहोचली आहे. मुख्यमंत्री व इतर प्रमुख खात्यांचे मंत्री विदर्भातीलच असताना सुद्धा विदर्भाची समस्या सुटली नाही. विदर्भात एकही नवीन मोठा उद्योग निर्माण झाला नाही. त्यामुळे बेरोजगारीची समस्या कायम आहे. ४ जुलैपासून नागपूर येथे पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन होत आहे. यासाठी संपूर्ण मंत्री, आमदार नागपुरात येणार आहेत.
सरकारला आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी नागपूर बंद ठेवला जाणार आहे, अशी माहिती मुनघाटे यांनी दिली. पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी तथा माजी आ.डॉ.रमेश गजबे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, समया पसुला, रमेश भुरसे, सुरेश बारसागडे, पांडुरंग घोटेकर, भास्कर बुरे उपस्थित होते.