वैरागडात पाणी टंचाई तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:18 AM2018-05-09T00:18:08+5:302018-05-09T00:18:08+5:30
वैलोचना नदी पात्रात असलेल्या जुन्याच ७५ हजार लिटर क्षमतेच्या नळ योजनेतून गावाला पाणी पुरवठा होत आहे. तसेच नळ योजनेच्या विहिरीत पाणीसाठा कमी असल्याने वैरागड गावात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वैलोचना नदी पात्रात असलेल्या जुन्याच ७५ हजार लिटर क्षमतेच्या नळ योजनेतून गावाला पाणी पुरवठा होत आहे. तसेच नळ योजनेच्या विहिरीत पाणीसाठा कमी असल्याने वैरागड गावात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील बरेच लोक पिण्यासाठी गळतीच्या पाण्याचा वापर करीत आहेत.
ग्रामस्थ पाईप लाईन वॉल्वमधून निघणारे गळतीचे पाणी पिण्यासाठी आपल्या घरी नेत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. वैरागड येथील वाढत्या लोकसंख्येमुळे जुन्या नळ योजनेचे पाणी गावाला पुरत नाही. परिणामी मागील १०-१५ वर्षापासून उन्हाळ्यात वैरागड येथे पाणी टंचाईची समस्या जाणवते. येथील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. सद्य:स्थितीत गावातील पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणच्या नळाला पिण्यापुरतेही पाणी येत नाही. जेवढे पाणी येते ते गढूळ असते. त्यामुळे अनेक नागरिक हातपंप व विहिरीचा आधार घेऊन आपली पाण्याची गरज पूर्ण करीत आहेत. मात्र या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरवर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन मागील दोन ते तीन वर्षांपासून वैरागड येथील गोरजाई डोहावर अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त नवीन नळ योजनेचे काम प्रस्तावित आहे. सद्य:स्थितीत या नळ योजनेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे, अशी माहिती ग्रामीण पेयजल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गेल्या तीन-चार वर्षाच्या तुलनेत वैरागड गावातील कुटुंबधारकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नळ योजनेचे पाणी गावात अपुरे पडते. गावातील पाणी टंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने ठोस उपाययोजना अद्यापही केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाप्रती रोष व्यक्त होत आहे. सदर समस्येसंदर्भात लोकमतने अनेकदा वृत्त प्रकाशित करून ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र निगरगट्ट प्रशासनाला अद्यापही जाग आली नाही.
महिलांची पाण्यासाठी पायपीट
वैरागड गावात सार्वजनिक विहिरी व हातपंप आहेत. मात्र या साधनांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे अनेक कुटुंब नळ योजनेच्या पाण्यावर अवलंबून असतात. मात्र वैलोचना नदीची पाणी पातळी खालावली असल्यामुळे येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिला व मुली सकाळपासूनच पाण्यासाठी पायपीट करीत असतात. हातपंप व विहिरीवर महिलांची सकाळपासूनच गर्दी दिसून येते.
पाणी समस्या कमी करण्यासाठी नदी पात्रात तत्काळ हातबोअर पंप बसविण्यात आला आहे. मात्र भूजलपातळी इतकी खोल गेली आहे की, या हातबोअर पंपाचे पाणी विहिरीपर्यंत पोहोचत नाही.
- एन. ए. घुटके, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत वैरागड