विहीरगाव जंगलाला आग
By admin | Published: March 29, 2017 02:28 AM2017-03-29T02:28:41+5:302017-03-29T02:28:41+5:30
देसाईगंज वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या विहीरगाव येथील एफडीसीएमच्या ८० क्रमांकाच्या कम्पार्टमेंटमध्ये
वन विभागाचे दुर्लक्ष : ऊन वाढताच आगी लागण्याचे प्रमाण वाढले
जोगीसाखरा : देसाईगंज वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या विहीरगाव येथील एफडीसीएमच्या ८० क्रमांकाच्या कम्पार्टमेंटमध्ये सोमवारी सकाळच्या सुमारास आग लागली. या आगीत लाखो रूपयांची वनसंपदा जळून खाक झाली आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच क्षेत्र सहायक पवार हे वनवा लागलेल्या ठिकाणी कार घेऊन आले. मात्र आग विझविण्यासाठी त्यांनी कोणतेच प्रयत्न केले नाही. यावरून एफडीसीएम आगीबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. जंगलाला आग लागल्यानंतर लाखो रूपयांची वनसंपदा नष्ट होते. वनवा लागू नये किंवा वनवा लागल्यानंतर तो तत्काळ विझविता यावा, यासाठी राज्य शासनाने वन विभागाला कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर निधी वन विभागाच्या स्थानिक कार्यालयांना उपलब्ध करून दिला जातो. मात्र आग न लागण्यासाठी करावयाच्या उपाययोजना केवळ कागदोपत्रीच केल्या जातात व त्यापासून मिळणारे लाखो रूपये वन कर्मचारी आपल्या खिशात टाकत आहेत. या गंभीर प्रकाराकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. एप्रिल महिन्यामध्ये आगी लागण्याच्या घटना वाढत असल्याने विशेष उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
आलापल्ली नजीक वणवा
आलापल्लीपासून अवघ्या तीन किमी अंतरावरील आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील जंगल परिसराला आग लागली. या आगीत लाखो रूपयांची वनसंपदा नष्ट झाली. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास लागलेल्या वणव्याने उग्ररूप धारण केले होते. मात्र आगविझविण्यासाठी वन विभागाचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. आलापल्ली येथे वन विभागाचे शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. तरीही आगीकडे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.