गावठाणच्या सनद मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 05:00 AM2020-09-24T05:00:00+5:302020-09-24T05:00:32+5:30
गावठाण मोजणीच्या सनदेपासून नागरिक वंचित राहिले. परिणामी येथील नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. वर्षभरापासून याबाबत पाठपुरावा सुरू होता. अखेर मंगळवारी जिल्हा अभिलेख अधीक्षक एस. ए. बोरसे यांनी कोरची येथे भेट देऊन येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आठ दिवसांत चुकांची दुरूस्ती करून मोजणीच्या सनदा देण्याची ग्वाही दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत गावठाण मोजणीचे काम केल्यानंतर सनद मिळकत पत्रिका व आखिव पत्रिका तयार करताना अनेक चुका करण्यात आल्या. त्यामुळे गावठाण मोजणीच्या सनदेपासून नागरिक वंचित राहिले. परिणामी येथील नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. वर्षभरापासून याबाबत पाठपुरावा सुरू होता. अखेर मंगळवारी जिल्हा अभिलेख अधीक्षक एस. ए. बोरसे यांनी कोरची येथे भेट देऊन येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आठ दिवसांत चुकांची दुरूस्ती करून मोजणीच्या सनदा देण्याची ग्वाही दिली.
कोरची नगर पंचायत अंतर्गत गावठाण मोजणीचे काम सनद मिळकत पत्रिका व आखीव पत्रिका तयार करण्याचे काम कार्यालयात बसून मागील दोन वर्षांपासून कासव गतीने सुरू होते. नागरिकांना वाटप करण्यात आलेल्या मिळकतीचे सर्वे नं. व नकाशाच्या क्षेत्रफळांचा ताळमेळ जुळत नव्हता. अनेक सनदांमध्ये अकृषक, गावठाणमध्ये बांधकाम करण्यात आलेली घरे झुडपी जंगलाच्या गट क्रमांकात दाखविली होती. त्यामुळे याची थेट चौकशी करताच यात अनियमितता व भोंगळ कारभार झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शहरातील ५०० हून अधिक कुटुंबांना जागेच्या सनदा मिळाल्या नाही. परिणामी ते घरकुलापासून वंचित राहिले. परंतु भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार टाळाटाळ केली. अखेर पाठपुराव्यानंतर सनदाच्या दुरूस्तीचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.
घरकूल बांधकामाचा तिढा सुटणार
कोरची येथील भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक एस. ए. बोरसे व चौकशी अधिकारी प्रदीप निकुरे यांनी भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. येथील ९५ टक्के घरे अकृषक नसल्याचे दिसून आले. या सर्वांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी न. पं. च्या वतीने स्थायी पट्टे मिळण्याची कार्यवाही केली जाईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे घरकूल बांधकामाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. यावेळी उपाध्यक्ष कमलनारायण खंडेलवाल, माजी नगराध्यक्ष नसरूद्दीन भामानी, नगरसेवक हिरा राऊत, मेघश्याम जमकातन, उपमुख्याधिकारी बी. व्ही. हाके, नायब तहसीलदार बी. एन. नारनवरे, एस. एस. माहुरकर, एस. व्ही. पारधी, अतुल वंजारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.