ग्रामस्थांची वीज कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:32 AM2018-07-21T00:32:54+5:302018-07-21T00:34:27+5:30
एटापल्ली तालुक्याच्या तोडसा, पेठा येथे व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा बंद राहत असतो. या भागात वीज लपंडावाची समस्याही तीव्र झाली आहे. सदर समस्येच्या मुद्यावर तोडसा व पेठा येथील नागरिकांनी आक्रमक होत थेट एटापल्लीच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली तालुक्याच्या तोडसा, पेठा येथे व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा बंद राहत असतो. या भागात वीज लपंडावाची समस्याही तीव्र झाली आहे. सदर समस्येच्या मुद्यावर तोडसा व पेठा येथील नागरिकांनी आक्रमक होत थेट एटापल्लीच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास धडक दिली. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या शाखा अभियंत्यांकडून माणुसकीची वागणूक न मिळाल्याने ग्रामस्थ नाराज झाले.
एटापल्लीपासून १० किमी अंतरावरील तोडसा हे गाव आहे. मात्र या गावात व परिसरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुरळीत वीज पुरवठा केला जात नाही. मागील वर्षभरापासून महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या कार्यालयात याबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र सदर तक्रारीचे निरसन महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांनी केले नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येच्या मुद्यावर तोडसाचे सरपंच प्रशांत आत्राम यांच्या नेतृत्वात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास नागरिकांनी एटापल्ली येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली.
तोडसा व परिसरातील वीज पुरवठा रात्रीच्या सुमारास नेहमीच बंद असते, अशी समस्या उपस्थित शाखा अभियंता वावरे यांच्यापुढे ग्रामस्थांनी मांडली. दरम्यान ग्रामस्थांची समस्या योग्यरित्या ऐकून न घेता शाखा अभियंत्यांकडून ग्रामस्थांना असभ्य वागणूक मिळाली, असे तेथील लोकांनी सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सरपंच प्रशांत आत्राम यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथे येऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. महावितरणच्या कार्यालयावर धडक दिल्याच्या वेळी तोडसा येथील देवनाथ दुर्वा, बिधान मंडल, राजू चर्लावार, तुळशिराम वेळदा, पुनेश्वर दुर्गे, नीलेश चांदेकर, पेठा येथील नितीन तोडेवार, सुरेश मेश्राम, दिनेश पुंगाटी, सैनू नरोटे यांच्यासह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. दरम्यान यावेळी शाब्दीक बाचाबाचीमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
शाखा अभियंत्यांविरोधात पोलिसात तक्रार
वीज समस्येला घेऊन एटापल्ली येथील महावितरणच्या कार्यालयात नागरिकांसमवेत गेले असता, शाखा अभियंता वावरे यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. नागरिकांना असभ्य वागणूक दिली. उलट नागरिकांवर पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी धमकीही दिली. अशा आशयाची तक्रार तोडसाचे सरपंच प्रशांत आत्राम व नागरिकांनी एटापल्ली पोलीस ठाण्यात २० जुलै रोजी दाखल केली आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून शाखा अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. शिवाय याबाबत त्यांनी जिल्हाधिकाºयांनाही निवेदन दिले आहे.