गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण नागरिक मोहफुलांच्या वेचणीत व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 04:07 PM2020-04-16T16:07:08+5:302020-04-16T16:08:51+5:30
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शहरी भागातील नागरिकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. मात्र भामरागडसारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनावर याचा फारसा परिणाम पडला नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक मोहफूल वेचणीच्या कामात व्यस्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शहरी भागातील नागरिकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. मात्र भामरागडसारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या जीवनावर याचा फारसा परिणाम पडला नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक मोहफूल वेचणीच्या कामात व्यस्त आहेत.
कोरोना व्हायरसचा संसर्ग गडचिरोली जिल्ह्यात होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. केंद्र व राज्य शासनाने सुद्धा लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे जिल्ह्यातील तेंदू संकलन हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी यावर्षी मजुराचा रोजगार हिरावला आहे. कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोहफूल वेचणीच्या कामावर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र तेंदू घटकाच्या लिलावाची प्रक्रिया कोरोनामुळे रखडून पडल्याने प्रत्यक्ष संकलनाचे काम केव्हा सुरू होणार, असा प्रश्न भामरागड तालुक्याच्या आदिवासी नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
भामरागड तालुक्यातील आदिवासी व बिगर आदिवासी नागरिक गावात उपलब्ध झालेल्या भाजीपाला व घरात शिल्लक असलेल्या अन्नधान्यावर उदरनिर्वाह करीत आहेत. या भागात आदिवासी समाजातर्फे पारंपरिक पंडूम पोलवा सण मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. मात्र यावर्षी कोरोनाच्या संचारबंदीने पारंपरिक पंडूम पोलवा सण बऱ्याच गावात पुढे ढकलण्यात आला आहे. भामरागड तालुक्यातील मजुरांचे शेकडो कुटुंब तेंदूपत्ता संकलनाच्या कामातून वर्षभराच्या खचार्ची मिळकत प्राप्त करीत असतात. तेंदू संकलनाचे काम न मिळाल्यास या भागातील आदिवासी नागरिकांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.
गौण वनोपज संकलनातून अनेकांना रोजगार
भामरागड तालुक्यासह अहेरी उपविभागात जंगलाचे प्रमाण मोठे आहे. घनदाट जंगल असून येथून विविध प्रकारचे वनोपज आदिवासी समाजाच्या नागरिकांना उपलब्ध होत असतात. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक नागरिक तसेच महिला जंगलामध्ये जाऊन चारोळी व टेंभर संकलीत करीत असल्याचे दिसून येत आहे. सदर वनोपजासाठी सध्या लॉकडाऊनमुळे विक्रीची व्यवस्था नाही. त्यामुळे सदर वनोपज वाढवून त्याची साठवणूक केली जात आहे.
कोरोनाची संचारबंदी संपल्यानंतर भामरागड तालुक्यातून शहरी भागातील बाजारपेठेत चारोळी व टेंभर विक्रीसाठी आणण्यात येणार आहे. शहरी भागातील नागरिकांना या वनोपजाची विशेष आवड आहे. शहरातील लोक ते चवीने खात असतात. गडचिरोली, देसाईगंज, चामोर्शी व धानोरा तालुका मुख्यालयाच्या बाजारपेठेत एप्रिल अखेरीस व मे महिन्यात सदर वनोपज विकताना अनेक महिला दिसून येतात. यातून आदिवासी भागातील नागरिकांना आर्थिक मिळकत उपलब्ध होऊन रोजगार प्राप्त होतो.