ग्रामस्थांनी ग्रा.पं.ला ठोकले कुलूप
By Admin | Published: April 19, 2017 02:07 AM2017-04-19T02:07:16+5:302017-04-19T02:07:16+5:30
जिल्ह्यात वाढत्या उष्णतामानाबरोबरच पाणीटंचाईचे संकट अतिशय गंभीर स्वरूप धारण करीत आहे.
२२ लाख खर्चूनही समस्या कायमच : चोप येथे अत्यल्प पाणी पुरवठ्याने महिला व नागरिक संतप्त
गडचिरोली : जिल्ह्यात वाढत्या उष्णतामानाबरोबरच पाणीटंचाईचे संकट अतिशय गंभीर स्वरूप धारण करीत आहे. अनेक गावांत विहिरी कोरडया पडल्या आहेत. हातपंप बंद पडल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तर सोमवारी रात्री देसाईगंज तालुक्याच्या चोप येथे नळ योजनेतून पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना घडली.
कोरेगाव/चोप : देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत चोप ग्रामपंचातीत सन २००७-०८ या वर्षात २२ लाख रूपये खर्चून जलस्वराज्य योजनेतून पाणी टाकीचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी मर्यादित लोकसंख्या असल्यामुळे तात्पुरती गरज भासली. परंतु आता नळ कनेक्शनची संख्या वाढली असून वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही प्रत्येक घरात होऊ लागली आहे. त्यामुळे जुन्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कमी पडत आहे. त्यामुळे चोप गावात पाणी टंचाईची समस्या भिषण झाली आहे. नागरिकांना दोन घागरी पाणी मिळणेही कठीण झाल्याने संप्तत झालेल्या ग्रामस्थांनी चोप ग्रामपंचायतीवर मोर्चा नेऊन सोमवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना घडली आहे.
चोप गावची लोकसंख्या ३ हजार २३३ असून लोकसंख्येवर आधारित १ लाख ३० हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी गावात आहे. पण ग्रामपंचायत कार्यालयाच्या नियोजन शुन्यतेमुळे चोप गावात काही भागात ७० टक्के तर काही भागात ३० टक्के पाण्याची विभागणी झाली आहे. गावात मोठ्या प्रमाणावर बोअरवेल बंद झाले असून गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी सुध्दा आटलेली आहे. त्यामुळे चोपमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. महिलांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संप्तत झालेल्या नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. जोपर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू होणार नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांना निवेदनातून दिला आहे.
उल्लेखनिय बाब म्हणजे, गावापासून दीड किमी अंतरावर गाढवी नदी वाहते. तरीही या गावात पाणी समस्येचे संकट ओढावले आहे. नागरिकांना नळाचे पाणी मिळण्यास चोप येथे मोठी अडचण होत आहे. (वार्ताहर)