कोरोनाच्या संकटात गावकऱ्यांचा मातामायवर भरवसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:39 AM2021-05-20T04:39:34+5:302021-05-20T04:39:34+5:30
भेंडाळा परिसरात असलेल्या कान्होली येथील महिलांनी गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीवर पायी जाऊन घागर व चरवीमधून ...
भेंडाळा परिसरात असलेल्या कान्होली येथील महिलांनी गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीवर पायी जाऊन घागर व चरवीमधून डोक्यावर पाणी आणून गावातील मातामाय, हनुमान मंदिर या ठिकाणी वाहिले जात आहे. ग्रामदैवत असलेल्या मातामायवर महिला भरवसा करीत पूजाअर्चा करीत आहेत; पण ही संकल्पना पुरोगामी विचाराच्या लोकांना न पटण्यासारखी आहे. नागरिकांनी या पद्धतीच्या परंपरेत गुरफटून न राहता कोरोनाबाबत सांगितल्या जात असलेले नियम पाळले तर कोरोनाला दूर ठेवण्यात यश येईल, असे अनेकांना वाटते.
गावात कोणताही धार्मिक कार्यक्रम असला की मातापूजन करण्याची परंपरा आहे तसेच लग्न सोहळ्यापूर्वी मातामायला हळद नेली जात असते. एवढेच नव्हे तर गावातील कोणतेही संकट दूर करण्यासाठी ग्रामस्थ टाळ-मृदंग हाती घेऊन वाजतगाजत दिंडी काढत असतात. यातून आत्मिक समाधान लाभत असते, असा समज आहे. बदलत्या काळानुसार आज सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येत असला तरी पूर्वापार चालत आलेल्या प्रथा, परंपरा आजही ग्रामीण भागात घट्ट बसून आहेत.
सध्या कोरोना संकटाची दुसरी लाट सुरू असून शहरासह ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा शिरकाव झालेला असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक या रोगाने भयभीत झालेले आहेत. गावात कोरोना संकट येऊच नये, यासाठी महिलांनी पुढाकार घेत माता पूजनचा निर्णय घेत वैनगंगा नदीवरून पाणी आणून मातामायची पूजा केली आहे. असा चार पाच दिवस पूजन चालणार असल्याची माहिती गावांतील महिलांनी दिली. यावेळी शांता चुनारकर, कमल झाडे, नंदा चुनारकर, शोभा चौधरी, नीता चुनारकर, छकुली चुनारकर, सोनी चुनारकर, छाया घोटेकर, पल्लवी चुनारकर, संतोषी झाडे, पारू फाले, ललिता फाले, निर्मला फाले, मालता चुनारकर, शेवंता झरकर, पुष्पा गोहणे, वंदना वडुले, मंदा सोनटक्के, कमला शेंडे, कासू शेंडे उपस्थित होते.
(बॉक्स)
ग्रामदैवतांच्या पूजनाची जुनी परंपरा
गावात कोणतेही संकट येऊ नये यासाठी गावातील ग्रामदैवतांची पूजा करण्याची परंपरा अनादि काळापासून गावखेड्यात आहे. ग्रामीण भागातील शेतशिवारात आजही मातामायची मंदिरे आहेत. काही गावांत पक्के बांधकाम केलेली तर काही गावांत निसर्गाच्या सानिध्यात मातामायचे मंदिरे आहेत. पूर्वी वैद्यकशास्त्र फारसे प्रगत नव्हते त्याकाळात कांजण्या, गोवर यासारखे आजार गावात यायचे. त्यातून रुग्णांची सुधारणा करण्यासाठी तालुकास्थळी जावे लागत असे. अशा परिस्थितीत गावातील ग्रामदैवतांची आराधना केली जायची, असे गावातील जाणकार सांगत असतात.
(बॉक्स)
रोवणी हंगामात पाळतात पोलो
गावात खरीप हंगामातील धान पीक रोवणी हंगाम सुरू झाला की मंगळवार पोलो ही प्रथा आहे. रोवणी कामाला साप्ताहिक सुटी असते. पोलो असतो त्यादिवशी गावातील ग्रामदैवताची पूजाअर्चा केली जाते. किमान पाच मंगळवार पोलो पाळला जातो व शेवटच्या मंगळवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात त्याचा शेवट केला जातो.