वाघांच्या बंदाेबस्तासाठी गावकऱ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:00 AM2021-09-02T05:00:00+5:302021-09-02T05:00:42+5:30
वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबास २५ लाखांची एकरकमी मदत द्यावी, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी, वाघांमुळे जखमी झालेल्या व्यक्तीस पाच लाख रुपये देण्यात यावेत. गडचिरोली आणि वडसा वन विभागातील उपवनसंरक्षकांनी नरभक्षी वाघांच्या बंदोबस्ताकरिता कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे निष्पाप ११ लोकांचा बळी गेला, यास जबाबदार दोन्ही वन विभागातील उपवनसंरक्षकांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गडचिराेली तालुक्यात धुमाकूळ घालत अनेकांचा बळी घेणाऱ्या वाघाचा ताबडतोब बंदाेबस्त करावा, या मागणीसाठी येथील वनसंरक्षक कार्यालयासमाेर बुधवार, दि. १ सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदाेलन सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी या आंदाेलनात राजकीय पदाधिकारी, सरपंचांसह १८ गावांमधील शेतकरी सहभागी झाले होते.
भारतीय जनसंसद शाखा गडचिरोलीसह ग्रामपंचायतींच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या ठिय्या आंदोलनादरम्यान विविध मागण्या करण्यात आल्या. त्यात वाघाच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबास २५ लाखांची एकरकमी मदत द्यावी, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी, वाघांमुळे जखमी झालेल्या व्यक्तीस पाच लाख रुपये देण्यात यावेत. गडचिरोली आणि वडसा वन विभागातील उपवनसंरक्षकांनी नरभक्षी वाघांच्या बंदोबस्ताकरिता कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे निष्पाप ११ लोकांचा बळी गेला, यास जबाबदार दोन्ही वन विभागातील उपवनसंरक्षकांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, आदी मागण्यांचे निवेदन वनसंरक्षक डाॅ. किशाेर मानकर यांना देण्यात आले.
या गावकऱ्यांच्या आंदाेलनाचे नेतृत्व जनसंसदचे पदाधिकारी नीलकंठ संदोकर, विजय खरवडे, रमेश बांगरे, गडचिरोली पंचायत समितीचे सभापती माराेतराव इचाेडकर, उपसभापती विलास दशमुखे, आंबेशिवणीचे उपसरपंच योगाजी कुडवे आदींनी केले.
आंदाेलनात पंचायत समिती सदस्य रामरतन गाेहणे, डाॅ. नीलिमा सिंग आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
सरपंच-उपसरपंचांचा आंदाेलनात सहभाग
- ठिय्या आंदोलनात तालुक्यातील आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमौशी, खुर्सा, गिलगाव, मुरमाडी, अमिर्झा, मौशिखांब, टेंभा, चांभार्डा, धुंडेशिवणी, राजगाटा चेक, उसेगाव, चेप्रा, दिभना, गोगाव, अडपल्ली, चुरचुरा, नवेगाव, पोर्ला, मेंढा अशा १८ गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक सहभागी झाले आहेत. गेल्या काही महिन्यात बळी गेलेले नागरिक याच गावांच्या परिसरातील रहिवासी हाेते. काही शेतकऱ्यांची गुरेही वाघांनी ठार मारली आहेत.
- तर शेतकऱ्यांच्या हातात बंदुका द्या
- गेल्या तीन-चार महिन्यांपासून गडचिरोली तालुक्यातील १८ गावांच्या परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या १० महिन्यांत ११ शेतकऱ्यांचा बळी गेला असून, अनेक जनावरेही वाघाचे शिकार झाले आहे. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाने वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरणाऱ्या या वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या हातात बंदुका द्या, वाघाचा आम्ही बंदोबस्त करतो, असा इशारा पं.स.उपसभापती विलास दशमुखे व भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी यावेळी दिला. तीन दिवसांत त्या वाघांना जेरबंद करा, अन्यथा वनसंरक्षक कार्यालयाला कुलूप ठोकू, असेही ते म्हणाले.