दामरंचा परिसरातील गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:56 AM2019-09-01T00:56:36+5:302019-09-01T00:57:06+5:30
दामरंचा परिसरात आसा, नैनगुडम, मोदुमडगू, वेलगूर, भंगारामपेठा, कोयागुडम, चिटवेली, चिंतारेव, रूमलकसा, मांड्रा, कोळसेपल्ली, कोरेपल्ली, कवठाराम, कपेवंचा, मडगू, तोंडेर आदी गावांचा समावेश आहे. या परिसरात भामरागड तालुक्यातील हेमलकसापासून वीज पुरवठा केला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : अहेरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही विद्युत पोहोचली नाही. काही ठिकाणी केवळ वीज खांब व तारा लावण्यात आल्या आहेत. ही स्थिती असतानाच दामरंचा परिसरातील अनेक गावे महिनाभरापासून अंधारात आहेत. तरी सुद्धा या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे.
दामरंचा परिसरात आसा, नैनगुडम, मोदुमडगू, वेलगूर, भंगारामपेठा, कोयागुडम, चिटवेली, चिंतारेव, रूमलकसा, मांड्रा, कोळसेपल्ली, कोरेपल्ली, कवठाराम, कपेवंचा, मडगू, तोंडेर आदी गावांचा समावेश आहे. या परिसरात भामरागड तालुक्यातील हेमलकसापासून वीज पुरवठा केला जातो. हेमलकसा-ताडगाव-मन्नेराजाराम या वीज लाईनमार्फत वीज पुरवठा करण्यात आला आहे. परंतु सदर परिसर जंगल व्याप्त अतिदुर्गम आहे. पावसाळा व हिवाळ्यात परिसरात नेहमीच विजेचा लपंडाव असतो. विशेष म्हणजे या परिसरात एकही लाईनमन मुख्यालयी राहत नाही. रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसºया दिवशी वीज पुरवठा सुरळीत होईल, याचीही शाश्वती नसते. परिणामी नागरिकांना अनेक रात्री अंधारात काढाव्या लागतात.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा तब्बल एक महिन्यापासून परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून सरपटणाºया विषारी प्राण्यांचा वावर असतो. अशा स्थितीत गावातील नागरिक अंधारामुळे रस्त्याने आवागमन करू शकत नाही. दुर्गम भागात वीज समस्येचा सामना नेहमीच करावा लागतो. तरी सुद्धा ही समस्या सोडविण्याकडे महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करतात. दामरंचा परिसरात हेमलकसा-मन्नेराजाराम ही विद्युत लाईन आहे. सदर परिसर जंगलव्याप्त व अतिदुर्गम असल्याने काही बिघाड आल्यास वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वेळीच पोहोचत नाही. त्यांनाही भामरागड गाठण्यासाठी अनेक अडचणी येतात. परिणामी नागरिकांना वीज समस्येचा सामना करावा लागतो.
केंद्र शासनाच्या वतीने ‘प्रधानमंत्री सहज बिजली’ यासारख्या योजनांचा अंमल केला जात आहे. परंतु दामरंचा परिसरात ही योजना व उपक्रम कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील लोकप्रतिनिधीही येथील वीज समस्येबाबत उदासीन आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
३३ के व्ही उपकेंद्राची मागणी धूळ खात
कमलापूर येथे ३३ के व्ही उपकेंद्र निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या उपकेंद्रातून दामरंचा परिसरात वीज पुरवठा केल्यास या परिसरातील वीज समस्या सुटू शकते. याबाबत परिसरातील नागरिकांच्या वतीने अनेकदा लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकाºयांना निवेदने देण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले. कमलापूर येथे ३३ के व्ही उपकेंद्र निर्माण झाल्यास परिसरातील वीज समस्या सुटण्यास मदत होऊ शकते.