जिमलगट्टा परिसरातील गावे विकासापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:45 AM2020-12-30T04:45:01+5:302020-12-30T04:45:01+5:30
जिमलगट्टा : अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा गाव अजूनही विकासापासून वंचित आहे. मूलभूत सुविधा सुद्धा मिळत ...
जिमलगट्टा : अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा गाव अजूनही विकासापासून वंचित आहे. मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
जिमलगट्टा ग्रामपंचायत अंतर्गत रसपल्ली, मेडपल्ली, येदरंगा, येर्रागट्टा या गावांचा समावेश आहे. या गावांमधील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. वर्षातून केवळ दोन ते तीन वेळा पथदिवे लावले जातात. पथदिवे बंद असल्याने या सर्वांचा धोका वाढला आहे. रस्त्यावरच मोकाट जनावरे राहत असल्याने मार्गक्रमण करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. येथील सार्वजनिक मुत्रीघराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पडला आहे. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. मत्रिघराच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. मागील वर्षी ग्रामपंचायतीने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम केले. मात्र याचा वापर होत नाही. जिमलगट्टा येथे बीएसएनएलचे टॉवर आहे. या टॉवरच्या बॅटऱ्या पूर्णपणे निकामी झाल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होताच टॉवर काम करणे बंद होत असल्याने मोबाईल सेवा ठप्प पडते.