घरकुलासाठी विनारॉयल्टी पाच ब्रास रेती देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:41 PM2019-01-02T23:41:13+5:302019-01-02T23:42:29+5:30
आवास योजनेतील लाभार्थ्यांना कोणतीही रॉयाल्टी न आकारता घरकूल बांधकामासाठी रेती देण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत. यामुळे कोणत्याही लाभार्थ्यांचे घरकूल बांधकाम थांबणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ अंतर्गत लाभार्थ्यांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आवास योजनेतील लाभार्थ्यांना कोणतीही रॉयाल्टी न आकारता घरकूल बांधकामासाठी रेती देण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत. यामुळे कोणत्याही लाभार्थ्यांचे घरकूल बांधकाम थांबणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ अंतर्गत लाभार्थ्यांना दिली.
मुख्यमंत्री आणि विविध योजनांचे लाभार्थी यांच्यात थेट संवाद घडविण्याऱ्या लोकसंवाद उपक्रमाला बुधवारपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान आवास योजना तसेच रमाई व शबरी आवास योजनेच्या विविध जिल्ह्यातील एकूण ५८९ लाभार्थ्यांनी या उपक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सहभाग घेतला. गडचिरोली येथील एन.आय.सी. मधील कक्षातून जिल्ह्यातील १५ लाभार्थी यात सहभागी झाले. या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला.
शासकीय योजनांचा लाभ घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांचे आभार मानले. तसेच प्रत्येकाची विचारपूस करून नव्या सूचना मांडण्याचे आवाहन केले. घरकुलासाठी शासनाने पारदर्शी पद्धत राबविली असून यामध्ये काही अडचणी असल्यास किंवा कोणी हेतूपुरस्पर अडचण निर्माण केल्यास लाभार्थ्यांनी थेट माहिती द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. घरकूल कामासोबच त्यांची कौटुंबिक माहितीही मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १२ लाख घर बांधकामाचे २०१९ पर्यंत नियोजन असून आतापर्यंत सहा लाख घरकुल बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित सहा लाख घरकूल यावर्षात पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. हक्काचे घर देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यंमत्री म्हणाले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन.आय.सी.चे अधिकारी एस.आर.टेंभूर्णे व जिल्हाग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी सहकार्य केले. या लोकसंवादात नरेश महाडोळे, शमा जावेद शेख, महेंद्र बारापात्रे, हिरामण कोकोडे, लोमेशे धारणे, लहानु भोयर, ज्ञानेश्वर भोयर, रेमा गावडे, अशोक गावतुरे, ज्ञानेश्वर पेंदाम, लोकमित्र बारसागडे, बालाजी वाघरे, भागुबाई थोराक, केमन केसलापुरे, केदारनाथ रामटेके, दिपा उंदीरवाडे, गोविंदा वालदे, नरेश मेश्राम यांच्यासह अनेक लाभार्थी सहभागी झाले होते.
घरकुलाचे स्वप्न ठरले खरे
प्रधानमंत्री व रमाई आवास योजनेची गडचिरोली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने आमच्या घरकुलाचे स्वप्न सत्यात उतरले, अशी प्रतिक्रिया सहभागी सर्वच लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. शासनाच्या या योजनेमुळे स्लॅबचे पक्के घर मिळाल्याची भावना अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केली. गोरगरीब व दुर्बल घटकातील जनतेला घरकूल मिळाल्याने अनेक लाभार्थ्यांनी शासनाचे यावेळी आभार मानले. काही लाभार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना घरकूल बांधकामातील अडचणीही यावेळी सांगितल्या.