खासगी वाहनांकडून नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:37 AM2021-07-27T04:37:57+5:302021-07-27T04:37:57+5:30
कुरखेडा : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांबा पासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहने उभी ठेवून प्रवासी भरण्यास बंदी आहे. मात्र, ...
कुरखेडा : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांबा पासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहने उभी ठेवून प्रवासी भरण्यास बंदी आहे. मात्र, कुरखेडा येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अतिक्रमणामुळे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे.
भिवापूर - आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग - आमगाव (महल) - नेताजी नगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गोगाव बसथांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली - आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गोगाव येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावेत, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधक अभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.
आरमाेरीत पार्किंगच्या व्यवस्थेचा अभाव
आरमाेरी : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. नगरपरिषदेने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आहे.
अपंग युवक विवाह अनुदान योजनेची जागृती करा
आष्टी : संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या वतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र, या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने अनेक अपंग युवक, युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.
व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध साहित्य विकत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गांधी चाैकात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व हातठेल्यांची गर्दी असते. पालिका प्रशासन कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.
कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा
गडचिरोली : जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळ रोपांचा उपाय शोधला आहे. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविण्याची मागणी आहे.
औद्योगिक वसाहती स्थापन करा
गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. याठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सूट देत वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे खड्डे खोदले आहेत.
शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या
काेरची : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे.
जिल्हाभरात जळाऊ लाकडांचा तुटवडा
गडचिरोली : जिल्हाभरातील वनविभागाच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठी ही लाकडे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. लाकडांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
पशुपालन योजनांची जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करा
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
लिंक फेल मुळे कामे होताहेत प्रभावित
अहेरी : केंद्र शासनाने विविध योजनांची प्रक्रिया व प्रशासकीय कामे ऑनलाईन केली आहेत. त्यामुळे योजनेचे अनेक लाभार्थी तसेच कर्मचारी सुद्धा बरीच कामे ऑनलाईन स्वरूपात करीत आहेत. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून बीएसएनएल तसेच खासगी कंपन्यांची लिंक फेल असल्याने ऑनलाईन कामे प्रभावित होत आहेत.
कार्यालयातील थम्ब मशीन सुरू करा
गडचिरोली : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील थम्ब मशीन बंद पडल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे उशिरा येणे सुरू झाले आहे. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळे थम्ब मशीन तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.
निस्तार डेपो देण्याची मागणी धूळखात
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावात त्वरित निस्तार डेपो देण्याची मागणी होत आहे. चामोर्शी भागातील नगारिकांना सांस्कृतिक कार्यक्रम व अंत्यविधीसाठी इतर ठिकाणांहून लाकडे आणावी लागत आहेत.
मंजूर टॉवर तत्काळ बांधण्याची मागणी
गडचिरोली : बीएसएनएलने गडचिरोली जिल्ह्यात नवीन ९० टॉवर मंजूर केले आहेत. या टॉवरचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे. बीएसएनएलने टॉवर उभारल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना मोबाईल सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
प्रभारी लाईनमन मुळे नागरिकांना त्रास
अहेरी : जिल्ह्यातील बहुतांश गावात लाईमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. त्यामुळे वीज सुरळीत करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गावासाठी लाईनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
कुरखेडा : नोकर भरतीवर बंदी घातली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेक युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कर्ज मिळत नसल्याने अडचणी येत आहेत.