विसापूर परिसर टँकरमुक्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:37 AM2019-03-07T00:37:48+5:302019-03-07T00:38:18+5:30
गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर, विसापूर टोली परिसरात स्वतंत्र पाणीटाकी व नळ पाईपलाईनअभावी दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र पालिका प्रशासनाने सदर रखडलेल्या कामाची सर्व प्रक्रिया पार पाडून पाणी टाकी व पाईपलाईनच्या कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली आहे.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर, विसापूर टोली परिसरात स्वतंत्र पाणीटाकी व नळ पाईपलाईनअभावी दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र पालिका प्रशासनाने सदर रखडलेल्या कामाची सर्व प्रक्रिया पार पाडून पाणी टाकी व पाईपलाईनच्या कामाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली आहे. एवढेच नाही तर निविदा प्रक्रियाही सुरू झाली अहे. त्यामुळे सदर काम पूर्ण झाल्यानंतर विसापूर व विसापूर टोलीचा परिसर टँकरमुक्त होणार आहे.
विसापूर व विसापूर टोली येथील कुटुंबांसाठी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून विसापूर व टोलीच्या मधात जि.प.शाळेच्या जागेवर पाच लाख लीटर क्षमतेची स्वतंत्र पाणीटाकी उभारण्यात येणार आहे. या भागात नळपाईप लाईनसुद्धा टाकण्यात येणार आहे. २ कोटी ७२ लाख रुपये खर्चातून हे काम होणार आहे. सदर कामाला ११ फेब्रुवारी २०१९ रोजी तांत्रिक मान्यता मिळाली असून २ मार्च २०१९ ला जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
गडचिरोली पालिकेची सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना वैनगंगा नदीच्या बोरमाळा नदीघाटावर कार्यान्वित करण्यात आली आहे. या नळ योजनेअंतर्गत गोकूलनगर, इंदिरा गांधी चौक, विवेकानंदनगर आदीसह एकूण सात जलकुंभ उभारण्यात आले आहे.
दरवर्षीच्या उन्हाळ्यात विसापूर व विसापूर टोली भागात पाणीटंचाई जाणवत असल्याने या भागात स्वतंत्र पाणीटाकी व नव्याने नळ पाईपलाईनचे काम मंजूर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली. दरम्यान पालिकेचे तत्कालीन पाणीपुरवठा सभापती केशव निंबोड यांनी सदर योजना मार्गी लावण्यासाठी शासन व प्रशासन दरबारी पाठपुरावा केला. नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मे २०१७ मध्ये भेट घेऊन विसापूरच्या पाणीटाकीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१७ ला पाणीटाकीच्या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी पालिकेला उपलब्ध करून दिला.
माजी पाणीपुरवठा सभापती निंबोड यांनी सदर योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण कार्यालय, चंद्रपूर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेकदा पाठपुरावा केला. त्यानंतर पाच ते सहा महिने रखडलेल्या या योजनेचे काम अखेर मार्गी लागले. गडचिरोली पालिका प्रशासनाने सदर पाणीटाकी व नळ पाईपलाईन कामाची प्रक्रिया हाती घेतली असून येत्या दोन दिवसांत ही निविदा आॅनलाईन पाहता येणार आहे.
निविदा बोलाविण्यात आले असून लोकसभा निवडणुकीनंतर कंत्राटदाराला वर्क आदेश देऊन कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात येणार आहे. सहा ते सात हजार इतक्या वाढीव लोकसंख्येला पाणी पुरणार, असे नियोजन करण्यात आले आहे.
टिल्लूपंप व चढामुळे पाणी पोहोचेना
दरवर्षीच्या उन्हाळ्यात वैनगंगा नदीची पातळी खालावते. त्यातच अनेक लोक नळाला टिल्लूपंप लावून पाणी खेचतात. परिणामी चढाचा भाग असलेल्या विसापूर, विसापूर टोली परिसरात पाणी पोहोचत नाही. त्यामुळे या भागात उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. गतवर्षी व त्यापूर्वीच्या तीन ते चार वर्ष विसापूर भागात उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.
विसापूर-पाथरगोटा पांदण रस्त्याचे काम मंजूर
गडचिरोली नगर पालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून विसापूर-पाथरगोटा या पांदण रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. सदर रस्ता हा वैनगंगा नदीघाटाकडे जाणारा रस्ता आहे. तब्बल ५४ लाख रुपयांच्या निधीतून सदर रस्त्याचे काम होणार आहे. या कामासाठीची निविदा प्रक्रिया पालिकेने हाती घेतली असून या कामासाठी १० निविदा प्राप्त झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. प्राप्त निविदा उघडणे शिल्लक असून लोकसभा निवडणुकीनंतर या रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे. पाथरगोटा भागात अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. या रस्त्याचे काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे.