यशाच्या आनंदापूर्वीच वशिष्ठची एक्झिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:59 PM2018-06-08T23:59:10+5:302018-06-08T23:59:10+5:30
रिपब्लिक इंग्लिश मिडीयम स्कुलमधील अस्थिव्यंग वशिष्ठ भास्कर रामगुंडम याने दहावीत ८७.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. पण हा आनंद साजरा करण्यासाठी त्याला काळाने संधीच दिली नाही.
विवेक बेझलवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : रिपब्लिक इंग्लिश मिडीयम स्कुलमधील अस्थिव्यंग वशिष्ठ भास्कर रामगुंडम याने दहावीत ८७.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. पण हा आनंद साजरा करण्यासाठी त्याला काळाने संधीच दिली नाही. आठवडाभरापूर्वी १ जून रोजी त्याला काळाने हिरावलं. ८५ टक्के दिव्यांगत्व असताना ८७.२० टक्के गुण घेऊन सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या वशिष्ठचे असे अकाली जाणे त्याच्या पालक आणि शिक्षकांनाच नाही तर सर्वांनाच चटका लावून गेले.
१७ वर्षे वयाचा वशिष्ठ जन्मापासून ८५ टक्के अस्थिव्यंग होता. त्याचे हात व पाय निष्काम असल्याने त्याला रोज उचलून शाळेत न्यावे लागत असे. त्याचे वडील भास्कर रामगुंडम हे शिक्षक तर आई प्रसन्ना गृहिणी आहे. वडीलाची नोकरी सिरोंचा तालुक्यातील परसेवाडा येथील आश्रमशाळेत होती. तिथेच वशिष्ठने आपले पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात पूर्ण केले. पण पुढे शिक्षणाच्या सोयीसाठी तो अहेरीत आला. अहेरीतील रिपब्लिक इंग्लिश मिडीयम शाळेत दहावीला शिकताना त्याने सर्वांची मने जिंकली. परीक्षेसाठी एका रायटरची गरज लहान बहीण वैष्णवी हिने पूर्ण केली. शारीरिक विकलांग असणाºयांना परीक्षेत इतरांपेक्षा १ तास जास्त मिळतो, तरी तो नेहमी नियमित वेळेच्या ५ मिनिट आधीच पेपर पूर्ण करायचा. दहावीत आपण चांगल्या गुणांनी पास होईल, असा विश्वास त्याने प्राचार्य राजेश रामगिरवार यांच्याकडे व्यक्त केला होता.