कृषी सहसंचालकाची मॅट रोपवाटिकेस भेट
By admin | Published: May 27, 2014 12:49 AM2014-05-27T00:49:39+5:302014-05-27T00:49:39+5:30
सन २०१४-१५ या चालु वर्षात मानव विकास विकास योजनेंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने गडचिरोली तालुक्यात
पाच गावांत मॅट प्रकल्प : शेतकर्यांशी संवाद साधून अडचणी जाणल्या
गडचिरोली : सन २०१४-१५ या चालु वर्षात मानव विकास विकास योजनेंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने गडचिरोली तालुक्यात पाच गावामध्ये यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीचे प्रकल्प घेण्यात आले. पारडी येथील बळीराजा बहुउद्देशिय संस्थेचे उपाध्यक्ष वसंत नागोस यांच्या शेतावर एक एकर क्षेत्राकरिता मॅट नर्सरी स्थापन करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या मॅट रोपवाटिकेस आज नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, जि. प. चे कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर, आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे यांनी मॅट रोपवाटीका तयार करणे, बियाण्यांची लागवड, पाणी, खते व किडीचे व्यवस्थापन आदीबाबत शेतकर्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच या सर्व अधिकार्यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. आत्मा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या खरीप हंगामात गडचिरोली तालुक्यातील पारडी, आंबेशिवणी, चांदाळा, मारकबोडी, मारदा या पाच गावात मॅट नर्सरी स्थापना करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गावातील शेतकर्यांच्या नोंदणीकृत गटांची निवड करून ९० टक्के अनुदानावर भात लागवड यंत्र, भात कापणी यंत्र, कोणोविडर, युरिया ब्रिकेट्स अप्लीकेटर्स व पॉवरटिलर आदी यंत्र वितरित करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. याप्रसंगी गडचिरोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. बी. महंत, कृषी विस्तार अधिकारी दि. मा. जंगले, आत्माचे जी. एच. जांभुळकर, कृषी पर्यवेक्षक एन. जी. बडवाईक, कृषी सहाय्यक एस. पी. पोटे, गटाचे अध्यक्ष मुकुंदा निकुरे, नेताजी लोंढे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी धान रोवणी यंत्राचीही पाहणी केली. कृषी विभागाच्यावतीने ९० टक्के अनुदानावर कृषी यंत्र वितरित होत असल्याने जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)