अधिकाऱ्यांची आश्रमशाळेला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:16 AM2018-03-21T01:16:16+5:302018-03-21T01:16:16+5:30
आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत रामगड येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविले जात असल्याच्या मुद्यावरून तेथील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार सोमवारी उजेडात आला.
ऑनलाईन लोकमत
कुरखेडा : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत रामगड येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविले जात असल्याच्या मुद्यावरून तेथील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार सोमवारी उजेडात आला. सदर प्रकाराची माहिती कळताच दुसऱ्या दिवशी मंगळवारला पदाधिकारी व गडचिरोली प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी थेट रामगडची आश्रमशाळा गाठली. येथे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांशी चर्चा करून वस्तूस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील एका बंद खोलीत साठवून ठेवलेल्या धान्य व इतर साहित्याचा पंचनामा केल्याची माहिती आहे. शासनाकडून वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता पुरविण्यात आलेले धान्य व इतर साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून न देता त्याची विल्हेवाट इतरत्र लावण्यात येते, असा आरोप करीत सदर धान्य कोठीत न ठेवता एका बंद खोलीत साठवून ठेवण्यात आला. सदर कुलूप बंद खोली उघडून दाखविण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी अधीक्षकांकडे केली होती. मात्र ही मागणी अधीक्षकाने धुडकावून लावल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. सोमवारी सकाळपासूनच येथील अधीक्षक गैरहजर असल्याने याबाबत मुख्याध्यापकांकडे विद्यार्थ्यांनी तगादा लावला. दरम्यान मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये वाद उफाळला. त्यानंतर मंगळवारी पं. स. सभापती गिरीधर तितराम, उपसभापती मनोज दुनेदार, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, पं. स. सदस्य बौद्धकुमार लोणारे, गुरूदेव टेकाम, हरिराम टेकाम तसेच पं. स. शिक्षण विस्तार अधिकारी वाघाडे, सहायक प्रकल्प अधिकारी लांडे, शिक्षण विस्तार अधिकारी मडावी यांनी शाळेत जाऊन कुलूपबंद खोलीचा पंचनामा केला. यावेळी येथे धान्य व ब्लँकेट, फिनाईन व इतर साहित्य आढळून आले.
मुख्याध्यापक व अधीक्षक गैरहजर
रामगडच्या आश्रमशाळेला पदाधिकारी तसेच आदिवासी प्रकल्प व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी भेट दिली असता, यावेळी शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षक गैरहजर होते. या संदर्भात पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भोजनात दर्जा ठेवण्याची सूचना अधिकारी व पदाधिकाºयांनी केली.