एसडीओंची आंदोलनाला भेट, मात्र तिढा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:51 AM2019-08-20T00:51:20+5:302019-08-20T00:52:10+5:30
एटापल्लीतील नागरिकांनी १६ आॅगस्टपासून आपल्या स्थानिक मागण्यांसाठी सुरू केलेले बाजारपेठ बंदचे आंदोलन सोमवारीही सुरूच होते. काही वेळ चक्काजाम आंदोलनसुध्दा करण्यात आले. दरम्यान एटापल्लीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी कैलास अंडील यांनी आंदोलनस्थळाला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्लीतील नागरिकांनी १६ आॅगस्टपासून आपल्या स्थानिक मागण्यांसाठी सुरू केलेले बाजारपेठ बंदचे आंदोलन सोमवारीही सुरूच होते. काही वेळ चक्काजाम आंदोलनसुध्दा करण्यात आले. दरम्यान एटापल्लीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी कैलास अंडील यांनी आंदोलनस्थळाला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. मात्र आंदोलकांचे समाधान न झाल्याने मंगळवारीही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त असलेल्या एटापल्ली तालुक्यातील समस्या सोडवाव्या, यासाठी १६ आॅगस्टपासून एटापल्ली येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला आहे. मागील चार दिवसांपासून एटापल्लीतील बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, मेडिकल, चहा टपऱ्या, हॉटेल बंद आहेत. सोमवारी प्रभारी एसडीओ कैलास अंडील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
त्यावेळी काही लोकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी, जिल्हाधिकाºयांशी मागण्यांसंदर्भात चर्चा करावी, असे अंडिल यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. तसेच एकदम टोकाची भूमिका न घेता बाजारपेठ सुरू करा. बाजारपेठ सुरू ठेवण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असेही आंदोलकांना सांगितले. मात्र जोपर्यंत पालकमंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी आंदोलनाला भेट देत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास केलेल्या रास्ता रोको आंदोलनात शालेय विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांनी सहभाग घेतला.
आठवडी बाजारालाही बसणार फटका?
दर मंगळवारी एटापल्ली येथे आठवडी बाजार भरतो. नागरिकांच्या आंदोलनामुळे आठवडी बाजारसुध्दा बंद ठेवला जाणार आहे. दरम्यान माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम, जि.प. बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी आंदोलनस्थळाला भेट देऊन चर्चा केली. चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ठाणेदार सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.