विसोराच्या शंकरपटाची मजा हरपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:47 AM2021-02-05T08:47:41+5:302021-02-05T08:47:41+5:30

विसोरा : लोकरंजन, मनोरंजन आणि स्वकीयांच्या भेटीगाठीतून लग्नगाठी या उदात्त हेतूने झाडीपट्टीत पूर्वी शंकरपट आता मंडई आणि दंडार, नाटक ...

Visora lost the fun of Shankarpat | विसोराच्या शंकरपटाची मजा हरपली

विसोराच्या शंकरपटाची मजा हरपली

googlenewsNext

विसोरा : लोकरंजन, मनोरंजन आणि स्वकीयांच्या भेटीगाठीतून लग्नगाठी या उदात्त हेतूने झाडीपट्टीत पूर्वी शंकरपट आता मंडई आणि दंडार, नाटक यांचा लोकोत्सव भरतो. झाडीपट्टी रंगभूमीला सजवताना ज्या गावांनी जणू माहेरचा वाटा उचलला त्यात विसोरा गावाचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. संक्रांतीनंतरच्या तिसऱ्या गुरुवारी होणाऱ्या विसोराची शंकरपट आणि दंडार, नाटकांना शंभरहून जास्त वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. मात्र गेल्या पाच-सात वर्षांपासून शंकरपटावर बंदी आली आणि झाडीपट्टीतल्या विसोराच्या शंकरपटाची मजा हरपली. आता मंडई आणि नाटकांच्या माध्यमातून ही प्रथा टिकवली जात आहे. परंतु यंदा कोरोनाच्या भीतीने विसोरावासीयांनी मंडई आणि नाटक आयोजित न करण्याचा निर्णय घेतल्याने शतकोत्तर परंपरा खंडित झाली आहे.

विसोरा रहिवासी माजी न्यायाधीश तथा नाट्यकलावंत ज्ञानदेव परशुरामकर, कातकर पुंडलिक नेवारे यांनी चर्चेतून अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. शंकरपटासाठी महिनाभर पूर्वीपासूनच लगबग आणि तयारी सुरू व्हायची. याकामी विशिष्ट पुरुष नेमलेले असायचे. पटाची दान तयार करणे, सीमा आखणे, सिग्नल बनवून जमिनीत उभा करणे ते शंकरपट संपेपर्यंत घाटमास्टर, सिग्नलमास्टर डोळ्यात तेल घालून काम करीत. बैल शर्यतीसाठी आलेल्या बैल जोड्या आणि बैल मालक व सोबतची डझनभर माणसे असा लवाजमा दाखल होत असे. विसोराची शंकरपट म्हणजे झाडीपट्टीत सुदूर प्रसिद्ध त्यामुळे गावात तोबा गर्दी. बैल शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी पूर्वी पैसे आकारले जात नसत पुढे काही रुपये आकारुन प्रवेश होत असे. दोन दानीवर बैलजोड्या जुंपलेले दोन छकडे धावत. आधी जिकडून बैल जोड्या सुटत तिकडे घंटा वाजवून शर्यत सुरू होई. जिथे शर्यत संपत असे तिथे दोन्ही बाजूला दोन माणसे झेंडी बांधलेले बांबू धरून उभे असत. बैलांची शर्यत जिंकल्यास पारितोषिक म्हणून यातली एक झेंडी विजेत्याला देऊन गौरव केला जात असे. त्याकाळी या झेंडीला खूप खूप महत्त्व आणि मान होता. नंतर बक्षीस म्हणून मेंथॉल बत्ती, झुली, भांडे या भेटवस्तू देण्यात येत असत. बैल जोडी जिंकताच गोपाळ बांधव ढोलकी वाजवून जिंकलेल्या बैलजोडीचे स्वागत करीत. याच काळात मनाेरंजनासाठी रात्री दंडार सादर हाेत असे. काळ बदलल्याने दंडारची जागा नाटकांनी घेतली. विशेष म्हणजे एकाच रात्री सहा ते आठ नाटकांचे आयोजन केले जाते.

झाडीच्या पट्ट्यात विसोरा येथील बैल शर्यत आणि नाटक पाहण्यासाठी पाहुणे, सोयरे, मित्रमंडळी हमखास दाखल होत.

बाॅक्स

सर्वात जुना फिरता रंगमंच विसाेरात

विसाेरा येथील नाट्यदर्दी कलावंतांनी नाटक प्रेमापोटी विदेशी पायपेटी, व्हायोलिन, ऑर्गन विकत घेतला जे आजही जपून ठेवले आहेत. झाडीपट्टी रंगभूमीवर दुर्मिळ असा फिरता रंगमंच विसोरा येथे आहे.

शंकरपट बंदीमुळे पट शौकीन नाराज असून बैलावर प्रामाणिकपणे जिवापाड प्रेम करून त्याची पोटच्या पोरासमान काळजी घेत निव्वळ छंद, हौस म्हणून आधी बैलशर्यत होत असे. त्यामुळे अनेकांना रोजगार प्राप्त असे. आता शंकरपट बंद झाल्याने आधीची मजा राहिली नाही. अशी खंत अनेकांनी बोलून दाखवली.

या वर्षी कोरोनाची दाट छाया पुसट होत असतानाही मनातील भीती कायम आहे. त्यामुळे मंडई आणि नाटके आयोजित करण्यासाठी गावातल्या नागरिकांनी पुढाकार घेतला नाही. विसोराच्या नागरिकांनी यंदा मंडई आणि नाटक आयोजनाला बंगल दिली आहे.

Web Title: Visora lost the fun of Shankarpat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.