६ हजार ९१३ जणांचे स्वेच्छा रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:10 AM2018-01-05T00:10:37+5:302018-01-05T00:12:12+5:30

गडचिरोली जिल्ह्यात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो.

 Voluntary blood donation of 6 thousand 9 13 people | ६ हजार ९१३ जणांचे स्वेच्छा रक्तदान

६ हजार ९१३ जणांचे स्वेच्छा रक्तदान

Next
ठळक मुद्दे वर्षभरात ७ हजार २८६ बॅगचा वापर : दोन रक्तपेढीवरच जिल्हाभरातील रूग्णांचा भार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या वर्षभराच्या कालावधीत शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन रक्तपेढ्या मिळून एकूण ६ हजार ९१३ बॅग इतक्या रक्ताचे संकलन झाले. तर ७ हजार २८६ बॅग रक्ताचा वापर विविध आजाराच्या रूग्णांसाठी वर्षभरात करण्यात आला. यावरून ३७३ बॅग इतके रक्त जिल्हाबाहेरून आणावे लागले.
जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्त पेढीमार्फत २०१७ मध्ये वर्षभरात १३६ रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून एकूण ५ हजार ९९० बॅग रक्ताचे संकलन झाले. यापैकी ४ हजार ८७९ बॅग रक्त जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांसाठी लावण्यात आले. तर ९१६ बॅग रक्त इतर खासगी रूग्णालयातील रूग्णांसाठी पुरविण्यात आले. जिल्ह्यात जिल्हास्तरावर गडचिरोली येथे १ व अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात १ अशा दोनच रक्तपेढ्या आहेत. तर पाच ठिकाणच्या रूग्णालयात रक्तसाठा केंद्राची व्यवस्था आहे.
कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयासह आरमोरी, धानोरा, चामोर्शी व सिरोंचा या चार ग्रामीण रूग्णालयात रक्तसाठा केंद्र आहे. अहेरी येथील रक्तपेढीच्या माध्यमातून वर्षभरात ९१६ बॅग रक्ताचे संकलन करण्यात आले. तर या रक्तपेढीतर्फे १ हजार ८६ रूग्णांसाठी रक्ताचा वापर करण्यात आला. रक्तदात्यांपेक्षा रक्ताची आवश्यकता असलेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा नेहमीच तुटवडा असतो. तत्काळ व सहज सर्व रूग्णांना रक्त उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. याकरिता वर्षभर विविध संघटना, राजकीय पक्ष, शाळा, महाविद्यालय, तसेच युवक व खेळाडूंचा पुढाकार वाढणे गरजेचे आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे दान जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी केले पाहिजे तेव्हाच गडचिरोली जिल्ह्यातील रक्त संकलन व साठा वाढू शकते. गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थिती व अंतराचा विचार करता गडचिरोली जिल्ह्यात रक्तपेढींची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुराव्याची गरज आहे. वाढदिवस व इतर उत्सवाच्या निमित्ताने स्वेच्छा रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
जीवन अमृत सेवेचा ९८४ रूग्णांना लाभ
गडचिरोली जिल्ह्यातील दोन रक्तपेढींमार्फत रूग्णांना रक्त पुरविले जाते. मात्र गंभीर रूग्णांना तातडीने रक्ताची गरज भासल्यास रक्त वेळेवर उपलब्ध होऊन संबंधित रूग्णाचे प्राण वाचावे यासाठी शासनाच्या वतीने जीवन अमृत सेवा योजना राबविली जात आहे. सदर योजनेंतर्गत जिल्हा रूग्णालयासह चार रूग्णालय संलग्नित आहेत. या योजनेंतर्गत ४० किमी अंतरापर्यंत फोन केल्यास काही वेळात रक्त पोहोचविले जाते. जीवन अमृत सेवा योजनेंतर्गत २०१७ मध्ये वर्षभरात ९८४ रूगणांना लाभ देण्यात आला. सदर योजनेमुळे ९८४ जणांचे प्राण वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात ७९, फेब्रवारी ५८, मार्च ७७, एप्रिल ६७, मे ५७, जून ६२, जुलै ८३, आॅगस्ट ९४, सप्टेंबर १५०, आॅक्टोबर १०७, नोव्हेंबर ७५, डिसेंबर महिन्यात ७५ रूग्णांना जीवन अमृत सेवेंतर्गत रक्त लावण्यात आले.

Web Title:  Voluntary blood donation of 6 thousand 9 13 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.