५३ केंद्रांवर आज ग्रामपंचायतींसाठी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:00 AM2018-02-27T00:00:40+5:302018-02-27T00:00:40+5:30
जिल्ह्यात मंगळवार दि.२७ ला ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यात ६ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक तर १० तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्ह्यात मंगळवार दि.२७ ला ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यात ६ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीत सार्वत्रिक तर १० तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. उर्वरित ग्रामपंचायतींमधील १४३ जागांवर सदस्यांची अविरोध निवड झाली असून ४३४ जागांवर मात्र निवडणूक लढण्यासाठी कोणीच नामांकन दाखल केले नसल्यामुळे त्या जागा रिक्त राहणार आहेत.
लोकशाही पद्धतीतून होणाºया या निवडणुकीला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नक्षल्यांचा नेहमी विरोध असतो. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही निवडणूक शांततेत पार पाडणे पोलीस यंत्रणेसमोर एक आव्हानच असते. ज्या ५३ केंद्रांवर ही निवडणूक होत आहे त्या केंद्रांपैकी १७ केंद्र अतिसंवेदनशिल तर १८ संवेदनशिल आहेत. त्यामुळे त्या केंद्रांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व मतदान केंद्रांवरील कर्मचारी आज त्यांच्या बेस कॅम्पवर पोहोचले. सर्व संबंधित मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून जिल्हाधिकाºयांनी दि.२७ ला संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रासाठी स्थानिक सुटी जाहीर केली आहे.
पोटनिवडणूक जाहीर झालेल्या २०७ ग्रामपंचायतींमध्ये सदस्या व सरपंचांची ५१९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते. मात्र आॅनलाईन नामांकन दाखल करण्यासाठी ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे बरेच उमेदवार नामांकनच दाखल करू शकले नाही. १४३ जागांवर तर एकाच उमेदवाराचा अर्ज आल्याने त्यांची निवड अविरोध होत आहे, तर प्रत्यक्ष निवडणूक होत असलेल्या ६२ जागांपैकी पैकी २९ सार्वत्रिक निवडणुकीतील तर २४ पोटनिवडणुकीतील जागा आहेत. प्रत्यक्ष निवडणूक होत असलेल्या जागा कमी झाल्याने निवडणूक यंत्रणेसमोरील ताण कमी झाला असला तरी तब्बल ४३४ जागांवर निवडणूक न होणे ही बाब लोकशाही प्रक्रियेसाठी मारक ठरत आहे.
सरपंचपदाच्या १६ जागांपैकी ५ जण अविरोध निवडल्या गेले आहेत. त्यामुळे ११ जागीच सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यांच्या १२० जागांपैकी ४२ जागा अविरोध निवडल्या गेल्याने ३८ जागांसाठी मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीतील २०७ ग्रामपंचायतींच्या ५१९ सदस्यांच्या जागांपैकी १०१ जागा अविरोध निवडल्या आहेत. त्यामुळे केवळ २४ जागांसाठी निवडणूक होत आहे.
मुरूमगावच्या मतदार यादीत गडबड
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे वॉर्ड क्रमांक ३ मधील पोटनिवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीत वार्ड क्रमांक २ मधील नागरिकांचे नाव गेल्याचा प्रकार उघडकीस आला. तहसील कार्यालयाने पाठविलेल्या मतदार यादीनुसार वार्ड क्र.३ मधील मतदारांची एकूण संख्या ४७४ आहे. मात्र त्यात वार्ड २ मधील नागरिकांचा समावेश असल्याने येथील नागरिक अचंब्यात पडले आहेत. विशेष म्हणजे ही प्रारूप मतदार यादी दि.२५ फेब्रुवारीला ऐन वेळेवर पाठविण्यात आली आहे. या बेजबाबदारपणासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
या ग्रामपंचायतींमध्ये होतेय निवडणूक
सार्वत्रिक व पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कोरची तालुक्यातील नवेझरी, बोदालदंड, दवंडी, कोटरा येथे सार्वत्रिक तर कोचीनारा येथे पोटनिवडणूक होत आहे. कुरखेडा तालुक्यात चिखली, आरमोरी तालुक्यातील अरसोडा व जोगीसाखरा येथे पोटनिवडणूक, गडचिरोली तालुक्यात देवापूर येथे सार्वत्रिक तर राजोली व कनेरी येथे पोटनिवडणूक, धानोरा तालुक्यात मिचगाव झाडा येथे सार्वत्रिक तर मेंढाटोला, चिंगली, मुरूमगाव येथे पोटनिवडणूक होणार आहे. चामोशी तालुक्यात तळोधी मे., वायगाव, अनखोडा, मार्कंडा क. तसेच मुलचेरा तालुक्यात विवेकानंदपूर येथे पोटनिवडणूक, एटापल्ली तालुक्यात हालेवारा येथे सार्वत्रिक तर तोडसा येथे पोटनिवडणूक, अहेरी तालुक्यात राजाराम येथे सार्वत्रिक तर खमनचेरू, इंदाराम, व्यंकटापूर, पेठा, जिमलगट्टा येथे पोटनिवडणूक, तथा सिरोंचा तालुक्यात कोटापल्ली येथे सार्वत्रिक आणि आसरअल्ली, अंकिसा, जाफ्राबाद येथे पोटनिवडणूक होत आहे.
दुपारी ३ पर्यंतच मतदान
निवडणूक आयोगाने सुरूवातीला जाहीर केल्याप्रमाणे ही निवडणूक २५ फेब्रुवारीलाच होणार होती. मात्र आॅनलाईन नामांकनातील अडचणी लक्षात घेऊन निवडणूक कार्यक्रम २ दिवस पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे मतदानाची तारीखही २७ झाली. सकाळी ७.३० पासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.