मतदानाने जि. प. मध्ये खाते वाटप
By admin | Published: November 10, 2014 10:43 PM2014-11-10T22:43:01+5:302014-11-10T22:43:01+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेत सोमवारी नवनिर्वाचित सभापतींना खाते वाटप करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत १६ विरूद्ध ३० मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरूद्ध सर्व गटांनी एकत्र येऊन मतदान केले.
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत सोमवारी नवनिर्वाचित सभापतींना खाते वाटप करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत १६ विरूद्ध ३० मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरूद्ध सर्व गटांनी एकत्र येऊन मतदान केले. त्यानंतर अतुल गण्यारपवार यांना बांधकाम व अर्थ आणि नियोजन समितीचे सभापतिपद देण्यात आले. तर कृषी व पशुसंवर्धन समितीचा कारभार आविसचे जि. प. सदस्य अजय कंकडालवार यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपाध्यक्ष जीवन नाट यांना शिक्षण व आरोग्य खात्याचा कारभार सोपविण्यात आला. आज दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेत सभेला जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. अध्यक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी बांधकाम व अर्थ नियोजन खाते उपाध्यक्षाकडे किंवा आविसचे अजय कंकडालवार यांच्याकडे देण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले. त्यानंतर सभागृहात मतदान घेण्यात आले. या मतदानात ३० सदस्यांनी अतुल गण्यारपवार यांना बांधकाम व अर्थ समितीचा कारभार देण्यासाठी मतदान केले. तर १६ सदस्यांनी अजय कंकडालवार यांच्या बाजूने मतदान केले. स्वत: कंकडालवार यांनीही गण्यारपवार यांच्या बाजुने मतदान केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच नाचक्की आजच्या सभेत झाली.
तसेच स्थायी समितीत रिक्त झालेल्या सदस्यांच्या जागेवर काँग्रेसचे पेंटाराम तलांडी, भाजपचे डॉ. तामदेव दुधबळे व अपक्ष जगन्नाथ बोरकुटे यांची निवड करण्यात आली. बांधकाम समितीत रेखा मडावी, छाया कुंभारे यांची वर्णी लागली. शिक्षण समितीत नागेश शानगोंडा, कृषी समितीत गीता हिचामी, वित्त समितीत पेंटारामा तलांडी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीत एक जागा रिक्त राहिलेली आहे. आजच्या सभेला ५१ पैकी ४८ सदस्य उपस्थित होते. या निवडणुकीत दोन सदस्य मतदानाला तटस्थ राहिले.