निधी आहे; पण पुरेसा नाही, तर गिधाड संवर्धन कसे हाेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 12:29 PM2022-01-20T12:29:35+5:302022-01-20T12:38:29+5:30
गडचिराेली जिल्ह्यात निसर्गरम्य वातावरण व उंच झाडे तसेच त्यांना मिळणारे खाद्य आदी कारणांमुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला १८० गिधाडांची नाेंद करण्यात आली हाेती.
गाेपाल लाजुरकर
गडचिराेली : दुर्मीळ पक्ष्यांच्या यादीत असलेल्या गिधाडांची संख्या दिवसेंदिवस घटत असतानाही गडचिराेली वन विभागात त्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले गेले. २०१७ पासून गडचिराेली वन विभागाच्या अखत्यारित ५ रेस्टाॅरंट सुरू करून त्यांना मेलेली जनावरे पुरविली जात आहेत; परंतु काेराेनाच्या संकटापासून शासनस्तरावरून वन विभागाला पुरेसा निधी मिळत नसल्याने गिधाड संवर्धनाचे काम सध्या संथगतीने सुरू आहे.
गडचिराेली जिल्ह्यात निसर्गरम्य वातावरण व उंच झाडे तसेच त्यांना मिळणारे खाद्य आदी कारणांमुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला १८० गिधाडांची नाेंद करण्यात आली हाेती. गडचिराेली तालुक्यातील मारकबाेडी, बाेदली, दर्शनी माल व चक, माल्लेर माल व चामाेर्शी तालुक्यातील कुनघाडा रै आदी रेस्टाॅरंटमध्ये मृत जनावरे पुरविली जातात. परंतु शासनस्तरावरून मिळणाऱ्या पुरेशा निधीअभावी येथील काम सध्या संथगतीनेच सुरू आहे. आवश्यक निधी न मिळाल्यास संवर्धन कसे हाेणार, असा सवाल पक्षीप्रेमींचा आहे.
काेणते गिधाड आढळतात?
गडचिराेली जिल्ह्यात ४ प्रकारचे गिधाड आढळून येतात. यामध्ये हिवाळ्यात बाहेरून दाखल हाेणारे हिमालयीन गिधाड, सिनेरियस वल्चर (काळा) गिधाड, व्हाईट बॅक वल्चर (पांढऱी पाठ), लाँग बिल्ट (लांब चाेच) आदींचा समावेश आहे.
काेणाला किती द्यावे लागते?
गिधाडांच्या रेस्टाॅरंटमध्ये खाद्याची व्यवस्था करण्यासाठी १ हजार रुपये खर्च येताे. जनावर मालकाला प्रती जनावर ५०० रुपये, जनावर आणणाऱ्या गिधाडमित्राला ३०० रुपये, तर कातडी साेलणाऱ्याला २०० रुपये द्यावे लागतात.
आणखी येथे आढळतात गिधाड
गडचिराेली जिल्ह्यासह नाशिक, रत्नागिरी, रायगड व काेकणात दुर्मीळ गिधाडे आढळतात. परंतु पाकिस्तान व हिमालयातून येणारा हिमालयीन गिधाड व सिनेरियस वल्चर (काळा) गडचिराेली जिल्ह्यात आढळताे हे वैशिष्ट्य आहे. हिमालयातून येणारा गिधाड हा हंगामी आहे.
गिधाडांच्या संवर्धनासाठी त्यांना सुरक्षित एरिया व वातावरण देण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. याशिवाय त्यांच्या खाद्याची व्यवस्था व्हावी म्हणून कंट्राेल रुम तयार केले जाईल. त्याद्वारे लाेक मेलेल्या जनावरांची माहिती कंट्राेल रुमला देतील. त्यानंतर हायड्राेलिक वाहनाद्वारे मृत जनावरे रेस्टाॅरंटमध्ये टाकले जातील, अशी व्यवस्था करण्याचा मानस आहे.
साेनल भडके, सहायक वनसंरक्षक गडचिराेली
गडचिराेली जिल्ह्यात गिधाडांची संख्या कशा प्रकारे वाढवता येईल, याकडे वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच उपहारगृहे नियमित सुरू ठेवल्यास गिधाडांचे संवर्धन हाेईल.
अजय कुकडकर, गिधाडमित्र