वडसाची रेल्वे वाहतूक डिजिटल
By admin | Published: July 18, 2016 02:15 AM2016-07-18T02:15:30+5:302016-07-18T02:15:30+5:30
अतिदुर्गम, आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव वडसा रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडी आवागमन आधुनिकीकरण करण्यात आले
सुरक्षेत वाढ : वेळेचीही झाली बचत; पर्यायी सिग्नल व्यवस्था
देसाईगंज : अतिदुर्गम, आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव वडसा रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडी आवागमन आधुनिकीकरण करण्यात आले असून पूर्णत: डिजिटल झाली आहे. त्यामुळे आता सुरक्षितेत वाढ होणार व वेळेचीही बचत होणार आहे.
वडसा रेल्वे स्टेशनवरील संपूर्ण रेल्वे आवागमन वाहतूक मॅन्युअल होती. रस्ता रहदारीवरील गेट पाडणे, दोन रेल्वे गाडीची क्रॉसिंग, रेल्वे गाडीच्या आवागमणासाठी देण्यात येणारे सिग्नल यासाठी टोकन प्रणाली कार्यान्वीत होती, ही प्रणाली किचकट व क्लिष्ट होती, यात वेळेचा अपव्यय तसेच असुरक्षिता निर्माण होत होती, तेव्हापासून आतापर्यंत हीच कार्यपद्धती अवलंबली जात होती.
वडसा रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडी आवागमन संदर्भात आमूलाग्र बदल होऊन मॅन्युअल पद्धती संपुष्टात आणून कम्प्यूटराईज्ड रेल्वे स्टेशन डिजिटल झाले आहे. यात दोन गाडींच्या क्रॉसिंगच्या दरम्यान कमीतकमी १० ते २० मिनिटांची बचत होत असून सोबतच सुरक्षितेत वाढ होणार आहे. पूर्वी सिग्नल सिस्टिममध्ये बिघाड आल्यास रेल्वे गाडीच्या रेल्वे स्थानकावर आगमन होण्यास फारच विलंब होत होता, मात्र आता संपूर्ण कार्यपद्धती डिजिटल होऊन कम्प्युटराइज्ड झाल्याने आता वैकल्पिक सिग्नलची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय थांबून बचत होणार आहे. तसेच इंग्रजांच्या कार्यकाळापासून प्रचलित कार्यपद्धतीत रस्ता रहदारीवरील गेट पाडण्यासाठी जवळपास तब्बल २० ते २५ मिनट लागत होते व वाहतूक जाम होत होती. आता डिजिटल झाल्याने १० ते १५ मिनिट लागणार आहेत. यामुळे गतिमानता प्राप्त झाली आहे.
वडसा रेल्वे स्टेशन डिजिटल कार्यपद्धती अधीक्षक पी. एस. भोंडे, वरिष्ठ स्टेशन मास्टर संजय कुमार, कनिष्ठ स्टेशन मास्टर रितेश कुमार हाताळत आहेत. (तालुका प्रतिनिधी)