वडसा अंडरब्रिज जानेवारीपर्यंत पूर्ण होणार
By admin | Published: November 13, 2016 02:03 AM2016-11-13T02:03:23+5:302016-11-13T02:03:23+5:30
जिल्ह्यातील एकमेव वडसा-गडचिरोली या ५२.१३ किमी रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी जमीन अधिग्रहणाची
खासदारांची माहिती : वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाबाबत चर्चा
गडचिरोली : जिल्ह्यातील एकमेव वडसा-गडचिरोली या ५२.१३ किमी रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी जमीन अधिग्रहणाची कार्यवाही तत्काळ पूर्ण करून रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. तसेच वडसा अंडरब्रिजचे काम जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली.
नागपूर येथे दक्षिण-पूर्व मध्यरेल्वेच्या विभागीय कार्यालयात आयोजित मंडलस्तरीय समितीच्या बैठकीत रेल्वे स्थानकाच्या अडचणी व समस्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला बालाघाट-शिवणी लोकसभा क्षेत्राचे खासदार बोधसिंग भगत, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, रेल्वेचे दक्षिण-पूर्व मध्यरेल्वेचे महाप्रबंधक सत्येंद्रकुमार, मंडल रेल्वे प्रबंधक, अमितकुमार अग्रवाल, उपमहाप्रबंधक डॉ. प्रकाशचंद्र त्रिपाठी, महाप्रबंधकांचे सचिव हिमांशू जैन, मुख्य परिचालन प्रबंधक जे. एन. झा, मुख्य प्रशासकीय अधिकारी एस. के. सिंगला, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक अर्जुन सिब्बल, अनिल कुमार, शिवराज सिंह उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
जमीन अधिग्रहणाची ६० टक्के कार्यवाही पूर्ण
वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी जमीन अधिग्रहणाची ६० टक्के कार्यवाही पूर्ण झाली आहे. तसेच भूमीअधिग्रहणाबाबत भूमीप्लॅन व प्रोजेक्टच्या पूर्ण लांबीचे शेड्युल यापूर्वीच जून २०१६ मध्ये पाठविण्यात आले आहे. भूमीप्लॅनचे राजस्व कागदपत्रासह सत्यापण आॅक्टोबर २०१६ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदारांच्या प्रश्नाला दिली.