दोन महिन्यांपासून मजुरी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:02 PM2019-05-20T23:02:10+5:302019-05-20T23:02:31+5:30
एटापल्ली नगर पंचायतीमध्ये सफाई काम करणाऱ्या २९ कामगारांची मजुरी दोन महिन्यांपासून मिळाली नाही. तसेच आपल्याला अतिशय कमी मजुरी देऊन कंत्राटदार आपली पिळवणूक करीत आहे. आठ दिवसांच्या आत मजुरी न मिळाल्यास तसेच मजुरीत वाढ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एटापल्ली नगर पंचायतीच्या सफाई कामगारांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली नगर पंचायतीमध्ये सफाई काम करणाऱ्या २९ कामगारांची मजुरी दोन महिन्यांपासून मिळाली नाही. तसेच आपल्याला अतिशय कमी मजुरी देऊन कंत्राटदार आपली पिळवणूक करीत आहे. आठ दिवसांच्या आत मजुरी न मिळाल्यास तसेच मजुरीत वाढ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एटापल्ली नगर पंचायतीच्या सफाई कामगारांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
एटापल्ली नगर पंचायतीत शहराच्या स्वच्छतेचा कंत्राट श्री स्वयंरोजगार सकारी संस्था अहेरी यांना दिला आहे. या कंत्राटदाराने कंत्राटी तत्त्वावर २९ मजूर लावले आहेत. मजुरांची मजुरी बँक खात्यात जमा न करता रोकड स्वरूपात दिली जाते. किमान वेतन कायद्यानुसार महिन्याला ११ हजार ५५५ रुपये मजुरी देणे आवश्यक असताना केवळ १५० रुपये मजुरी दिली जाते. एकाही कामगाराचे पीएफ खाते काढण्यात आले नाही.
दुर्गम भागात काम करणाºया रोजगार हमी योजनेच्या मजुराचे पैसे त्याच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र शहरात राहणाºया मजुरांची मजुरी रोकड स्वरूपात दिली जात आहे. यामध्ये नगर पंचायतीचे अधिकारी व कंत्राटदार यांच्यामध्ये मिलीभगत आहे, असा आरोप मजुरांनी केला आहे. नगर पंचायत कंत्राटदाराला प्रती मजूर अधिक मजुरी देते. मात्र कंत्राटदार केवळ १५० रुपये मजुरी कामगारांना देते. दिवसभर काम करणाºया कामगारांचे कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे.
मागील दोन महिन्यांची मजुरी मिळाली नाही. आठ दिवसांच्या आत मजुरी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सफाई कामगारांनी दिला आहे. मजुरी मिळण्यासाठी नगर पंचायत व कंत्राटदाराकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. तरीही कंत्राटदाराने मजुरी दिली नाही. सफाई काम करताना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा सुद्धा पुरविल्या जात नाही, असा आरोप मजुरांनी केला आहे.
पत्रकार परिषदेला अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष गीता मोहुर्ले, कोमल झाडे, सुरेखा करमरकर, नानू पुनधारी, शंकर पुलारी, शिंदू सोनुले, शालू मोहुर्ले, ममता मोहुर्ले, पुष्पा ठाकरे, गीता ठाकरे, जाईबाई मोहुर्ले, वच्छला मोहुर्ले, रश्मी कोटरंगे, वैशाली वाळके हजर होते.
नवीन कंत्राटात
नियमानुसार सुधारणा करा
२५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ८ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व विभागांना पत्र पाठवून सफाई कामगारांसाठी होणारे कंत्राट नवीन नियमानुसार लागू करावे, यामध्ये किमान कायद्यानुसार सफाई कामगारांना मजुरी देणे, बँक खात्यात मजुरी जमा करणे, ईपीएफ नियमित भरणे, कामगारांना लागू असलेल्या सोयीसुविधा पुरविणे आदींची पूर्तता करावी, असे निर्देश दिले आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतरही सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन महातो यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.