मच्छीमारांसाठी वैनगंगा नदी ठरत आहे जीवनदायिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 04:16 PM2020-12-18T16:16:44+5:302020-12-18T16:17:14+5:30
fishermen Gadchiroli News गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीमुळे सिंचनाची साेय तर झाली आहे. याशिवाय मासेमारी व्यवसायातूनही वर्षभराचा राेजगार प्राप्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीमुळे सिंचनाची साेय तर झाली आहे. याशिवाय मासेमारी व्यवसायातूनही वर्षभराचा राेजगार प्राप्त झाला आहे. आरमाेरी तालुक्याच्या अनेक गावातील मच्छीमारबांधव या व्यवसायावरच आपली उपजीविका करतात. शंकरनगर परिसरातील शेकडाे भूमीहीन बेराेजगारांसाठी वैनगंगा नदी जीवनदायिनी ठरत आहे.
आरमाेरी तालुक्याच्या शंकरनगर, सालमारा, रामपूर, रवी, अरसाेडा येथील शेकडाे भूमीहीन बेराेजगार व मच्छीमार वैनगंगा नदीत दरराेज मासेमारी करतात. वैनगंगा नदीत मासेमारीकरिता गेल्यानंतर ते रिकाम्या हाताने परत येत नाही. बारमाही वाहणारी ही नदी मासेमार बांधवांसाठी वरदान ठरत आहे. नदीत असंख्य डाेह तसेच खाेलवर पाण्याचे खडकाळ भाग आहेत. खाेलवर पाण्यात राेहू, कतला, मरट, झिंगे आदी प्रजातींचे मासे आढळतात. तीन ते चार किलाेग्रॅमपासून १८ ते २० किलाेपर्यंतच्या घाेगर व जरंग मासे पाहावयास मिळतात. अतिशय दुर्मळ माेस सुद्धा येथे दिसून येतात. परिसरातील भूमीहीन बेराेजगार दिवसा तसेच रात्रीच्या सुमारास डाेंग्याद्वारे धाेकादायक मासेमारी करतात. एकदा डाेंग्याद्वारे नदीपात्रात पाेहाेचल्यानंतर रिकाम्या हाताने कुणीच परत येत नाही. पावसाळ्यातील तीन महिने नदीपात्रातील मासेमारी बंद असते. मात्र पात्राच्या बाहेर मासेमारी केली जाते. वर्षातून जवळपास सात ते आठ महिने मासेमारी करता येताे. त्यामुळे वैनगंगा नदी मासेमारांसाठी जीवनदायिनी ठरत आहे.
नागपूर व चंद्रपूरला पाेहाेचवितात मासे
वैनगंगा नदीपात्रात मासेमारी केल्यानंतर ही मासे नागपूर व चंद्रपूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविले जाते. प्रत्येक मासेमार हजार ते पाच हजार रुपयापर्यंत मासेमारी करताे. यातून अनेक मासेमारांचा आर्थिकस्तर उंचावला आहे. भूमीहीन असतानाही अनेकांनी बरीच आर्थिक प्रगती केली आहे.