वैनगंगेचा प्रवाह तोडतोय दम, तीव्र जलसंकटाची चाहूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 10:59 PM2018-04-02T22:59:15+5:302018-04-02T22:59:15+5:30
वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. याचा फटका गडचिरोली शहराला बसण्यास सुरूवात झाली असून भविष्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. याचा फटका गडचिरोली शहराला बसण्यास सुरूवात झाली असून भविष्यात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गडचिरोली शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदी पात्रात इनटेकवेल खोदण्यात आली आहे. या विहिरीला पाणी येण्यासाठी दोन पाईप बसविण्यात आले आहेत. त्यापैकी एक पाईप पाण्यात पडून आहे. तर दुसरा पाईप पूर्णपणे पाण्याच्या बाहेर पडला आहे. त्यामुळे पंपाला पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने मागील दहा दिवसांपासून गडचिरोली शहराला अपुरा पाणी पुरवठा होत आहे. एक महिन्यापूर्वी जेसीबीच्या सहाय्याने नगर परिषदेने इनटेकवेलजवळ बंधारा बांधला. २०० फूट अंतरापर्यंत रेती उपसून नदीची पूर्ण धार विहिरीच्या बाजुला वळविली आहे. एक महिन्यापूर्वी दुसरा पाईप अर्धा पाण्यात बुडून होता. मात्र मागील १५ दिवसांपासून पाणी पातळी प्रचंड खाली गेली आहे. पाईप पूर्णपणे वर आला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला ही स्थिती आहे. जून महिन्यापर्यंत जवळपास अडीच महिने पुन्हा उन्हाळा शेकणार आहे. या कालावधीत जलसंकट तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जलशुध्दीकरण केंद्राला पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने या ठिकाणचे पंप जवळपास एक तास बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्ण भरत नाही. त्यातच उन्हाळा लागल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याची मागणी व पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाला असल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
दर दिवशी ६४ लाख लिटर पाणी पुरवठा
गडचिरोली शहराला दर दिवशी ६४ लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या जवळपास ५० हजार आहे. म्हणजेच प्रत्येक नागरिकाला दिवसाला १२८ लिटर पाणी पुरवठा होतो. शासनाच्या नियमानुसार प्रती व्यक्ती १३५ लिटर पाणी लागते. यावरून नगर परिषद प्रत्येक व्यक्तीला आवश्यक तेवढा पाणी पुरवठा करते. भावी जलसंकट लक्षात घेऊन नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे.
गोसेखुर्दमध्ये केवळ १० टक्के उपयुक्त जलसाठा
वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी गोसेखुर्द धरणावर आशा अवलंबून आहेत. मात्र या धरणातही केवळ १०.०३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. एवढे पाणी पुन्हा अडीच महिने वापरावे लागणार आहे. त्यामुळे गोसेखुर्द प्रशासनाकडे जरी पाणी सोडण्याची मागणी केली तरी नियमाप्रमाणेच पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
शहरातील सर्व वार्डांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने नियोजन केले आहे. सद्य:स्थितीत वृध्दाश्रमाजवळील टाकीमधून ज्या वार्डांना पाणी पुरवठा होतो, त्या वार्डांना एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. सकाळी विवेकानंदनगर, कन्नमवार नगर, कॅम्पएरिया, शिवाजी नगर, रामनगर, स्नेहनगर, लांझेडा या वार्डांना पाणी पुरवठा होत आहे. तर गोकुलनगर, गणेश नगर, चनकाई नगर व पोस्ट कार्यालयाच्या मागील बाजूस सायंकाळी एकदाच पाणी पुरवठा सुरू आहे. नदीची पाणी पातळी कमी झाल्यास इतरही वार्डांना एकच वेळच्या पाण्यावर भागवावे लागणार आहे.