चिखलातून काढावी लागते वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:38 AM2019-09-24T00:38:43+5:302019-09-24T00:39:14+5:30
गावात ग्रामपंचायत प्रशासन असतानाही येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे पक्का रस्ता निर्माण करण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या तिमरम येथे मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना एकफुट चिखलातूनच वाट काढावी लागते. त्यामुळे या त्रासापासून नागरिकांची मुक्तता केव्हा होणार असा सवाल नागरिक करीत आहेत.
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील गाव म्हणून तिमरमची ओळख आहे. गावात ग्रामपंचायत प्रशासन असतानाही येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून गावातील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. अनेक वर्षांपासून येथे पक्का रस्ता निर्माण करण्याची गरज आहे. नागरिकांनी यासाठी वारंवार स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींना साकडे घातले. परंतु काहीच उपयोग झाला नाही. ही समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप तिमरमवासीयांनी केला आहे. सध्या गावातील नागरिकांना आवागमन करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. एक ते दीड
फुट चिखल रस्त्यावर निर्माण झाला आहे. येथूनच नागरिक शेताकडे जात असतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून येथील रस्त्यावर खडीकरण करावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
सरपंच म्हणतात, रोहयोतून होणार काम
तिमरम येथील मिनी अंगणवाडी ते नाल्यापर्यंतचा रस्ता पूर्णत: चिखलमय झाला आहे. याच मार्गावर लोकवस्तीही आहे. शिवाय नागरिक येथूनच शेताकडे आवागमन करतात. या रस्त्याचे खडीकरण तसेच मजबुतीकरणाबाबत सरपंच महेश मडावी यांना विचारणा केली असता, सदर रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून केले जाणार आहे, असे सांगितले. परंतु मागील चार ते पाच वर्षांपासून या मार्गावर चिखल निर्माण होत असल्याने नागरिकांना ही समस्या असय्य झाली आहे. त्यामुळे नागरिकही त्रासले आहेत. त्यांना पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा आहे.