आराेग्य केंद्रांना इमारतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:33 AM2021-03-22T04:33:06+5:302021-03-22T04:33:06+5:30

एटापल्ली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे ...

Waiting for the building to health centers | आराेग्य केंद्रांना इमारतीची प्रतीक्षा

आराेग्य केंद्रांना इमारतीची प्रतीक्षा

Next

एटापल्ली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची आवश्यकता आहे.

काेट्यवधींची वाहने नष्ट हाेण्याचा धाेका

आरमाेरी : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. वाहने लिलाव केल्यास गरजू व्यक्तींना याचा लाभ होईल. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ

गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीज चोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात कार्यक्रमांदरम्यान विजेच्या तारांवर आकडा टाकून वीज चोरी केली जात आहे.

वाहनचालकांवर कारवाई थंडबस्त्यात

काेरची : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

अतिक्रमणामुळे जंगल धोक्यात

आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वन विभागात अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे.

वृक्षतोडीवर प्रतिबंध घालण्याची मागणी

अंकिसा : वनविभाग व विविध सामाजिक संघटनेच्यावतीने नागरिकांमध्ये वृक्षतोड न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे; परंतु जिल्ह्यातील वनांचे प्रमाण वृक्षतोडीमुळे कमी झाले आहे. परिणामी प्रदूषणात वाढ झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

घाण पाण्याच्या गटारांनी डास वाढले

आरमाेरी : स्थानिक नगर पालिका क्षेत्रात विविध वॉर्डांत मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याचे डबके तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या गटारींच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील कन्नमवार वॉर्डात अशा प्रकारचे घाण पाण्याची गटारे अनेक ठिकाणी आहेत.

शाखांअभावी शेतमाल विक्रीत अडचण

आरमोरी : जिल्ह्याच्या १२ तालुक्यांसाठी केवळ चार कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. आणखी दोन नव्या बाजार समित्या निर्माण कराव्यात, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. बाजार समित्या किंवा विद्यमान बाजार समित्यांच्या शाखा वाढल्यास शेतमालाला भाव मिळेल.

विद्युत खांबांमुळे

रस्ता झाला अरुंद

गडचिरोली : शहरातील आरमोरी मार्गावर विद्युत खांब रस्त्यावर असल्याने ते खांब बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

बेरोजगारांना मुद्रा कर्ज योजनेचा लाभ द्या

कुरखेडा : केंद्र सरकारने बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापित करण्याच्या उद्देशाने मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रांवर कर्ज देण्याची योजना सुरू केली. मात्र, या योजनेंतर्गत कर्ज देण्यास जिल्ह्यातील अनेक बँका चालढकल करीत आहेत. त्यामुळे बेरोजगार त्रस्त झाले आहेत.

पक्क्या रस्त्यांअभावी गावकऱ्यांचे हाल

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील वेंगनूर येथे अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. तळोधी मो., भेंडाळा, कान्होली, कमळगाव या भागांत पक्के रस्ते तयार करण्यात आलेले नाहीत.

कुपोषित भागामध्ये परसबाग निर्माण करा

भामरागड : जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला आहे. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविण्याची मागणी आहे. दुर्गम भागातील अनेक नागरिकांच्या घराच्या सभाेवताली माेकळी जागा आहे. या जागेचा सदुपयाेग हाेऊन घरीच भाजीपाला पिकेल.

Web Title: Waiting for the building to health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.