शिक्षकांना बदली आदेशाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:15 PM2019-06-17T23:15:47+5:302019-06-17T23:16:04+5:30
बदलीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली असून शिक्षक आता बदली आदेशाची प्रतिक्षा करीत आहेत. जे शिक्षक बदलीसाठी पात्र ठरले, अशा शिक्षकांना बदली अर्ज करण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बदलीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली असून शिक्षक आता बदली आदेशाची प्रतिक्षा करीत आहेत.
जे शिक्षक बदलीसाठी पात्र ठरले, अशा शिक्षकांना बदली अर्ज करण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. सर्व पात्र शिक्षकांनी बदलीचे अर्ज भरले आहेत. त्याचबरोबर शाळांची निवडही केली आहे. निवड केलेल्या २० शाळांपैकी नेमकी कोणती शाळा मिळते, यासाठी शिक्षक बदली आदेशाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा १७ जूनपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विदर्भातील शिक्षकांच्या याद्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षकांच्या याद्या अगोदर पाठविल्या जातील. सदर याद्या सीईओंच्या लॉगीनवर पाठविल्या जातात. या याद्यांची प्रतीक्षा केली जात आहे.
भामरागड, एटापल्ली, सिरोंचा हे नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल तालुके आहेत. या तालुक्यांमधील शाळांची निवड सहजासहजी शिक्षक करीत नाही. त्यामुळे या शाळांमधील जागा सुरूवातीच्या राऊंडमध्ये यावर्षी सुध्दा रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.