कर्जेली गावाला रस्त्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:38 AM2018-02-23T00:38:42+5:302018-02-23T00:38:58+5:30
छत्तीसगड राज्याच्या सीमलेगत असलेल्या कर्जेली गावात जाण्यासाठी रस्ता नाही. गावाच्या दोन्ही बाजूला नाले असून या नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावाचा जगाशी संपर्क तुटतो.
ऑनलाईन लोकमत
जिमलगट्टा : छत्तीसगड राज्याच्या सीमलेगत असलेल्या कर्जेली गावात जाण्यासाठी रस्ता नाही. गावाच्या दोन्ही बाजूला नाले असून या नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावाचा जगाशी संपर्क तुटतो.
कर्जेली गावात जवळपास ७० कुटुंब वास्तव्याने आहेत. वीज नसल्याने गावात सौरदिव्यांचे वाटप करण्यात आले होते. मात्र सौरदिवे बंद पडले असून आता केवळ त्याचे खांब शिल्लक आहेत. स्थानिक नागरिकांनी विजेचा पुरवठा करण्याबाबत वेळोवेळी मागणी केल्यानंतर गावाला वीज पुरवठा करण्याचे काम सुरू झाले आहे. खांब उभारण्यात आले असून वीज तारा लावल्या जात आहेत. रमेशगुडम, किष्टय्यापल्ली, कोर्ला या गावात ट्रॉॅन्सफॉर्मर बदलवून विद्युत खांब टाकणे सुरू झाले आहे. कामाची गती लक्षात घेतली तर पावसाळ्यापूर्वी कर्जेली, रमेशगुडम, किष्टय्यापल्ली, कोर्ला ही गावे उजाडण्याची शक्यता आहे.
गावात वीज येत असल्याचे आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर असले तरी रस्त्यांची दयनीय अवस्था बघून मन खिन्न होत आहे. कर्जेली परिसरात असलेल्या इतरही अनेक गावांना जाण्यासाठी रस्ता नाही. देचलीपेठा, मेटीगुडम, बिराडघाट, रमेशगुडम, किष्टय्यापल्ली, मुकनपल्ली, आसली, कोंजेड, कल्लेड या गावांना अजूनही डांबरी रस्त्याची प्रतीक्षा आहे. शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सोयीसुविधांसाठी गावकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे.
ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देत असल्याचा दावा शासनाकडून करण्यात येत असला तरी कर्जेली परिसरातील असंख्य गावे मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या भागाच्या विकासाकडे लक्ष घालून विकासाच्या योजना राबवाव्या, अशी मागणी कर्जेलीसह इतर गावातील नागरिकांकडून केली जात आहे.