टेकामेटा गावाला रस्त्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:38 AM2021-04-02T04:38:13+5:302021-04-02T04:38:13+5:30
कोरची : तालुका मुख्यालयापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेला टेकामेटा हा गाव आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व अतिसंवेदनशील क्षेत्र असून, ...
कोरची : तालुका मुख्यालयापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेला टेकामेटा हा गाव आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व अतिसंवेदनशील क्षेत्र असून, विकासापासून कोसो दूर आहे. या गावात जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही. गावाला किमान रस्ता देण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून हाेत आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही कोरची तालुक्यात काही अशी गावे आहेत, की त्याठिकाणी जाण्यासाठी कच्चे व पक्के रस्ते नाहीत. त्यापैकी टेकामेटा हे एक गाव असून, या गावात जाण्यासाठी आजही पायवाटेनेच जावे लागते. टेकामेटा हा गाव ग्रामपंचायत मोठा झेलियामध्ये आहे. या गावात एकूण वीस ते पंचवीस घरे आहेत. चारही बाजूनी जंगल आहे. गावालगत दाेन नाले असून, या नाल्यांवर पूल नाही. त्यामुळे पावसाळ्यात गावातून बाहेर पडण्यासाठी मार्गच उरत नाही. दोन ते तीन महिने बाहेरच्या लोकांशी संपर्क तुटतो. अशावेळी एखाद्या व्यक्तीची तब्बेत बिघडल्यास औषधोपचारासाठी व गर्भवती महिलांना दवाखान्यात प्रसुतीसाठी जाण्यास अनेक अडचणींना समोरे जावे लागते आणि वेळप्रसंगी जीवही गमवावा लागतो.
मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दळणवळण. पक्क्या रस्त्याने गावांना जोडले गेले पाहिजे. खरं म्हणजे मुख्य रस्त्यापासून ते तुळमुळापर्यंत कच्चा रस्ता आहे. पण तिथून टेकामेटाला जाण्यासाठी रस्ताच नाही. म्हणून शासन व प्रशासनाने तेथील लोकांच्या समस्या अग्रक्रमाने घेऊन रस्ता व पूल मंजूर करुन त्यांना मुख्य प्रवाहात जोडून त्यांचे जीवनमान उंचवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.