वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी राज्याच्या २० कोटींची प्रतीक्षा
By admin | Published: June 19, 2014 11:49 PM2014-06-19T23:49:11+5:302014-06-19T23:49:11+5:30
वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाच्या कामाला प्रारंभ करण्यासाठी तसेच नागपूर-नागभिड या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्याही कामाला मार्गी लावण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी
गडचिरोली : वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाच्या कामाला प्रारंभ करण्यासाठी तसेच नागपूर-नागभिड या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्याही कामाला मार्गी लावण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी दक्षिण-पूर्व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक नागभिड येथे आयोजित केली होती. या बैठकीत वडसा-गडचिरोली या बहुप्रलंबित रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून २० कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र राज्य सरकारच्या ५० टक्के वाट्यातील २० कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाल्याशिवाय रेल्वे मार्गाचे काम सुरू करता येणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासदारांसह उपस्थितीत लोकप्रतिनिधींना दिली.
या बैठकीत वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरू असे खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर त्यांनी राज्य सरकारच्या वाट्याची रक्कम येणे आवश्यक आहे, असे सांगितले. या बैठकीला ब्रह्मपुरीचे आमदार अतुल देशकर, उमरेडचे आमदार सुधीर पारवे, गडचिरोलीचे भाजप नेते प्रमोद पिपरे, रविंद्र बानथडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, भारत बावनथडे, सुनिल नंदनवार, होमदेव मेश्राम, राजू जराते आदी उपस्थित होते. या बैठकीत नागपूर-नागभिड या ब्रॉडगेज मार्गाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, याविषयावरही चर्चा करण्यात आली. या कामात असलेल्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. त्या अडचणी केंद्र सरकारकडून मार्गी लावल्या जातील, असे खासदार नेते यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)