चामोर्शीत दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:32 AM2018-07-05T00:32:50+5:302018-07-05T00:33:52+5:30
धानाचे पऱ्हे रोवणीसाठी तयार झाले आहेत. रोवणीसाठी आता शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे. चामोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची लागवड केली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : धानाचे पऱ्हे रोवणीसाठी तयार झाले आहेत. रोवणीसाठी आता शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
चामोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची लागवड केली जाते. त्यातही धान हे मुख्य पीक आहे. काही शेतकरी आवत्या पद्धतीने धानाची लागवड करीत असले तरी सर्वाधिक शेतकरी धानपिकाची रोवणीच करतात. यावर्षी मृगनक्षत्रात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे धानाचे पऱ्हे अगदी वेळेवर टाकण्यात आले. धानाचे पऱ्हे टाकल्याला आता २० दिवसांचा कालावधी उलटत चालला आहे. सदर पऱ्हे आता रोवणीयोग्य झाले आहेत. आद्रा नक्षत्रात अधूनमधून पाऊस येत होता. त्यामुळे पीक हिरवेगार आहे. मात्र धानाची रोवणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असल्याने मोठा पाऊस येणे आवश्यक आहे. ६ जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे. याच नक्षत्रात दरवर्षी रोवणीला सुरुवात होते. त्यामुळे याहीवर्षी या नक्षत्रात पाऊस पडेल, अशी आशा शेतकरीवर्ग करीत आहे. काही धानाच्या पऱ्ह्यांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शेतकरी धानाच्या पऱ्ह्यांवर कीटकनाशकांची फवारणी करीत आहे.
धानपिकाला पाणी देण्यासाठी तालुक्यात नदी, तलाव व बोड्या आहेत. मात्र चामोर्शी तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने अजूनही तलाव, बोड्या कोरड्याच पडल्या असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पावसाने पुरेशी सवड दिल्याने आवत्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे.