रुग्णालयात पाण्यासाठी हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:50 PM2018-03-25T22:50:00+5:302018-03-25T22:50:00+5:30

जिल्हा सामान्य रूग्णालयात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. शौचालयांमध्ये पाणी नाही. परिणामी घाण निर्माण झाली आहे.

Wake up in the hospital | रुग्णालयात पाण्यासाठी हाहाकार

रुग्णालयात पाण्यासाठी हाहाकार

googlenewsNext
ठळक मुद्देअपुरा पाणी पुरवठा : वार्डातील शौचालयांमध्ये पसरली घाण, खरेदी करून प्यावे लागते पाणी

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. शौचालयांमध्ये पाणी नाही. परिणामी घाण निर्माण झाली आहे. दुपारी ३ वाजताच्या नंतर पिण्याचेही पाणी संपत असल्याने खरेदी करून पाणी प्यावे लागत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातून आलेल्या गरीब रूग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत.
गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाणी टाकी आहे. मात्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नाही. नगर परिषदेकडून पाणी खरेदी केले जाते. नगर परिषद सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एक तास या प्रमाणे केवळ दोन तास पाणी पुरवठा करते. पाण्याच्या टाकीजवळ सुमारे प्रत्येकी ५० हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या दोन सम आहेत. मात्र एका तासात या सम भरत नाही. उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याचा वापर व मागणी वाढली आहे. मात्र पुरवठा तेवढाच असल्याने मागील १५ दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई रूग्णालयात निर्माण झाली आहे.
प्रत्येक वार्डात शौचालये आहेत. मात्र या शौचालयांमध्ये पाणी उपलब्ध नाही. परिणामी रूग्णांना आरोग्य कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या हातपंपाजवळचे पाणी आणावे लागत आहे. पुरेसा पाणी नसल्याने शौचालयात घाण पसरली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी रूग्णालय परिसरात टाक्या आहेत. मात्र या टाक्यांमधीलही पाणी दुपारी ३ ते ४ वाजतानंतर संपते. परिणामी नागरिकांना पिण्याचे पाणी खरेदी करावे लागत आहे. गरीब रूग्णाला बॉटलचे पाणी आर्थिकदृष्ट्या झेपावणारे नाही. तरीही पाण्यावाचून राहू शकत नाही. हातपंपाचे पाणी पिल्यास आणखी तब्येत बिघडण्याची शक्यता असल्याने काटकसर करीत पाणी खरेदी करावे लागत आहे.
जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी रूग्णालयातील पाण्याचा वापर होत आहे, असा आरोप काही रूग्णांनी केला आहे. असा प्रकार घडत असेल तर ही अतिशय गंभीर बाब असून रूग्णालयातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
निवासस्थानांनाही अपुरा पाणी पुरवठा
रूग्णालय परिसरातच आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांची निवासस्थाने आहेत. मात्र निवासस्थानांमध्येही अपुरा पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने कर्मचाºयांची बोंब आहे. विशेष म्हणजे, पाईपलाईन बरीच जुनी असल्याने बराचसा पाणी लिकेज होतो. त्यामुळे प्रत्यक्ष नळांना कमी प्रमाणात पाणी येते. परिणामी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
योजनेचा प्रस्ताव नियोजन विभागात धूळखात
महिला रूग्णालयासाठी कठाणी नदी घाटावर स्वतंत्र पाणी पुरवठा योजना बांधण्यात आली आहे. इंदिरा गांधी चौक ते जिल्हा सामान्य रूग्णालयापर्यंत पाईपलाईन टाकून याच योजनेचे पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा रूग्णालयाने तयार केला आहे. सदर प्रस्ताव नियोजन विभागात सादर केला आहे. मात्र हा प्रस्ताव नियोजन विभागात धूळखात आहे. याकडे पालकमंत्री व अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

दिवसेंदिवस रूग्णालयाचा विस्तार होत आहे. मात्र पाणी पुरवठा तेवढाच आहे. त्यामुळे कधीकधी पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. रूग्णालय परिसरात बोअरवेलवर पाणीपंप बसविण्याबाबत तत्काळ बैठक आयोजित करून पाणी समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. रूग्णालयासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना गरजेची आहे.
- डॉ. अनिल रूडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली

Web Title: Wake up in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.