गाडी लोहार समाजाच्या कुटुंबांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:00 AM2019-05-12T00:00:46+5:302019-05-12T00:01:11+5:30
शेती मशागतीच्या कामात यंत्राचा वापर होत असला तरी पारंपारिक साहित्याच्या माध्यमातून शेतकरी शेती मशागतीचे काम करीत आहेत. शेतीपयोगी ही अवजारे बनविणारा गाडी लोहार समाज मात्र विकासापासून कोसोदूर आहे.
सुधीर फरकाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : शेती मशागतीच्या कामात यंत्राचा वापर होत असला तरी पारंपारिक साहित्याच्या माध्यमातून शेतकरी शेती मशागतीचे काम करीत आहेत. शेतीपयोगी ही अवजारे बनविणारा गाडी लोहार समाज मात्र विकासापासून कोसोदूर आहे. तब्बल आठ महिने स्वत:चे गाव व घर सोडून उपजीविका करण्यासाठी या समाजाचे लोक गावोगावी भटकंती करीत असतात.
लोखंडापासून कुºहाड, विळा, कोयता, वासला, नांगर, फासा आदीसह बैलबंडीचे साहित्य तयार करण्याचे कौशल्य गाडी लोहार समाजाच्या लोकांमध्ये आहे. मध्य प्रदेशातील गाडी लोहार (राजपूत) समाजाचे लोक गडचिरोली जिल्ह्याच्या आष्टी भागात अशाच कामासाठी दाखल झाले आहेत. लोखंडावर घनाचे घाव घालून महाराष्ट्रासह इतर राज्यात भटकंती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत.
मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील शिलवानी तालुक्यातील जमेनिया या गावाचे ५०० ते ६०० कुटुंब आठ महिने उदरनिर्वाहासाठी विविध भागात भटकंती करीत आहेत. स्वत:च्या गावी केवळ चार महिने वास्तव्य केल्यानंतर इतर आठ महिने सदर समाजाच्या कुटुंबांचा संसार उघड्यावर मिळेल त्या ठिकाणी मोकळ्या जागेवर सुरू असतो. त्यांच्या जीवनातील संघर्ष कायम आहे.
१०० ते ४०० रुपयांपर्यंत साहित्याचे दर
गाडी लोहार बांधवांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू १०० ते ४०० रुपयांपर्यंत विकल्या जातात. कुऱ्हाडीला १०० ते २००, पावशी ८० ते १०० रुपये, विळा ६० ते १०० रुपये, कोयता १५० ते २५० रुपये, वासला १२५ ते २०० व नांगर फासा ३०० ते ४०० रुपये दराने विकले जाते. महागाईच्या युगात त्यांची मिळकत अत्यल्पच आहे.
निरागस बालकेही राहतात सोबत
गाडी लोहार समाजाचे अनेक कुटुंब आपले संपूर्ण बिºहाड घेऊन परराज्यात व जिल्ह्यात उदरनिर्वाहसाठी भटकंती करतात. दरम्यान त्यांच्यासोबत लहान मुले, मुलीही येतात. आपल्या आई-वडिलासोबत निरागस बालके बिºहाड असलेल्या ठिकाणी खेळत व बागळत असतात. परिणामी प्रसंगी त्यांची शाळाही बुडत असते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील पिढीलाही विकासासाठी फारशी संधी मिळत नाही.